रेल्वे सेवा आणि बस बंद..; उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन

मुंबई | बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी या बंदला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बंद विषयी माहिती दिली. उद्याचा बंद कडकडीत असणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, उद्याचा बंद विकृती विरूद्ध संस्कृती यासाठी आहे. आपली मुलगी शाळेत सुरक्षीत राहिल का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. आपली मुलगी कार्यालयात सुरक्षित आहे का? असा प्रश्न माता-भगिनींना पडला आहे. याला वाचा फोडण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे. आम्ही विकृतीविरोधात बंद पुकारलेला आहे. बंदचे यश-अपयश हे विकृती आणि संस्कृतीचे असणार आहे. आपल्या माता-भगिनींची सर्वांना चिंता आहे. हे सरकारला दाखवून दिले पाहिजे.
हेही वाचा – ‘माझा हातात सत्ता द्या, ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र..’; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
उद्याचा बंद फक्त महाविकास आघाडीच नाही तर सर्व नागरिकांच्या वतीने पुकारला गेला आहे. जात, धर्म, पंथ, भाषा या सीमा ओलांडून सर्वांनी सहभागी व्हावे. कडकडीत बंद असला तरी अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे २४ ऑगस्टचा बंद दुपारी २ वाजेपर्यंतच पाळावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच बंद दरम्यान दुकाने, रेल्वे, बस सेवा बंद ठेवायला हरकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या राज्याच्या लाडकी बहीण होऊ शकतात. हे त्यांनी उद्याच्या बंद दरम्यान दाखवून द्यावे. उद्याच्या बंदच्या आड पोलिसांनी दादागिरी करू नये. तसेच हट्टाने बंदचा फज्जा होईल, असे कृत्य करू नये. अन्यथा काही महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा फज्जा उडविल्याशिवाय राहणार नाही. बंद दरम्यान हिंसा होऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.