‘गोष्ट इथे संपत नाही-शिवचरित्र’ उपक्रमाच्या तिकीट विक्रीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उपक्रमात उलगडणार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘गोष्ट इथे संपत नाही-शिवचरित्र’ उपक्रमाच्या तिकीट विक्रीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. पाच ते २७ एप्रिलदरम्यान प्रत्येक शनिवार-रविवारी सकाळी ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम सादर होणार आहेत.
सर्व कार्यक्रमांची प्रस्तुती ‘रांका ज्वेलर्स’ यांची असून, ‘रावेतकर ग्रुप’ आणि ‘व्हीटीपी रिअल्टी’ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे सारंग भोईरकर व सारंग मांडके हे दोघे आठही कार्यक्रम सादर करतील.
मराठ्यांच्या इतिहासातील एखादी घटना निवडत त्याचे प्रभावी सादरीकरण करत ती प्रेक्षकांसमोर आणायची, असे याचे स्वरूप आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आठ महत्त्वाच्या अध्यायांचा इतिहास उलगडणार आहे.
वेळापत्रक (सर्व कार्यक्रम सकाळी ९.३० वा.)
शनिवार (ता. ५ एप्रिल) : अफजलखानाचा वध
रविवार (ता. ६ एप्रिल) : पन्हाळा ते पावनखिंड
शनिवार (ता. १२ एप्रिल) : पुरंदरचा तह
रविवार (ता. १३ एप्रिल) : आग्य्राहून सुटका
शनिवार (ता. १९ एप्रिल) : मोहीम मांडली मोठी
रविवार (ता. २० एप्रिल) : शिवराज्याभिषेक
शनिवार (ता. २६ एप्रिल) : दक्षिण दिग्विजय
रविवार (ता. २७ एप्रिल) : लढाई मराठी अस्तित्वाची
हेही वाचा – महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकला… ई साहित्याला राष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार
तिकिटांविषयी…
‘गोष्ट इथे संपत नाही-शिवचरित्र’ उपक्रम सशुल्क असून, सीझन पास आणि प्रत्येक प्रयोगासाठीचे वैयक्तिक तिकीट उपलब्ध
सीझन पास प्रत्येक व्यक्तीसाठी तीन हजार रुपये (तळमजला) व दोन हजार रुपये (बाल्कनी) अशा प्रकारांत उपलब्ध
प्रत्येक प्रयोगाचे वैयक्तिक तिकीट ५०० रुपये (तळमजला) आणि ३२० रुपये (बाल्कनी) इतके
तिकीट विक्री ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ संकेतस्थळांवर सुरू, बातमीबरोबर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही तिकीट आरक्षित करता येणार
बुधवारपासून (ता. २६) सकाळी नऊ ते ११.३० आणि सायंकाळी पाच ते आठदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात आणि गुरुवारपासून (ता. २७) लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथेही प्रत्यक्ष तिकीट विक्रीला सुरुवात होणार
आजही अनेक तरुणांना, लहान मुलांना महाराजांचा नेमका इतिहास माहिती नसतो. महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची पुरेशी ओळख नसते. ‘गोष्ट इथे संपत नाही-शिवचरित्र’ कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास उलगडतो. त्यामुळे आपला देदीप्यमान इतिहास समजून घेण्याची तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.