‘यांचा दिवटा पडला तरच काहीतरी चांगलं होईल’; उद्धव ठाकरेंची राणेंवर टीका

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांची कणकवलीत सभा पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी नारायण राणे, दीपक केसरकर आणि अमित शाह यांच्यासह महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी आज घराणेशाहीवर बोलतात, त्यांना बाळासाहेबांचा वारस म्हणून मी नको आहे. पण कोकणात ते बाप डोक्यावर व त्याची दोन मुले खांद्यावर घेऊन फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, की सिंधुदुर्गातील गुंडगिरी काही वर्षांपूर्वी कोकणातल्या जनतेने संपविली होती. मात्र, यंदा चुकून ते खासदार म्हणून निवडून आले. आता पुन्हा त्यांची दादागिरी सुरु होईल. आता जर पुन्हा तीच चूक झाली, तर बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल.
हेही वाचा – ‘दिलीप वळसे पाटलांना १०० टक्के पराभूत करा’; शरद पवारांचा हल्लाबोल
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सावंतवाडीचे नतद्रष्ट सांगतात, वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं तो दिवटा म्हणतो. यांना जोडे नाही मारायचे तर काय मारायचं? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही. केसरकर आणि इथला यांचा दिवटा पडला तरच काहीतरी चांगलं होईल, अशी टीका त्यांनी केली. तसेच नारायण राणेंना त्यांच्या साईजप्रमाणे सूक्ष्म खातं मिळालं होतं. मात्र, त्यांनी एकही सुक्ष्म उद्योग कोकणात आणला नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.





