‘दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकतील’; पृथ्वीराज चव्हाणांना वक्तव्य करणं भोवलं, स्पष्टीकरण देत म्हणाले..
Delhi Election 2025 | दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून देशभरात वातावरण तापलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीत फूट पडली असून आप आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष दिल्लीची निवडणूक जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या विधानावर आता त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दिल्लीच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. मला विश्वास आहे की तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे आणि निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आणि आपमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र तसे होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आजपासून मिळणार हॉलतिकीट, अशाप्रकारे करा डाउनलोड
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. ते म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता. आता सर्व प्रमुख पक्ष रिंगणात उतरल्याने खुली निवडणूक झाली आहे. काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली आहे आणि मला खात्री आहे की आपण विजयी होऊ.