To The Point : महाविकास आघाडीतील माजी आमदार विलास लांडेंकडून दिघीतील माजी सैनिकांचा विश्वासघात!
महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांचा पुरव्यानिशी आरोप : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांची अडचण
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
भोसरी विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे सध्या ‘फायर मोड’वर आहेत. महाविकास आघाडीतील माजी आमदारांनी दिघी येथील सैनिक भवनाच्या मुद्यावर देशासाठी आयुष्यभर कर्तव्य बजावलेल्या माजी सैनिकांचा विश्वासघात केला, असा पुराव्यानिशी गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांची अडचण झाली आहे.
दिघी येथे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच जाहीर सभा झाली. या सभेत आमदार लांडगे यांनी आक्रमक भाषण केले. दिघीमध्ये सुमारे ४ हजार ५०० माजी सैनिकांचे वास्तव्य आहे. या भागात माजी सैनिकांसाठी सैनिक भवन उभारण्यात आले आहे. या भवनाच्या कामावरुन आमदार लांडगे यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे हा मुद्दा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
माजी सैनिक भवनाच्या कामाचे भूमिपूजन दि. ३१ ऑगस्ट २०१४ रोजी करण्यात आले. ऑक्टोबर- २०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक होती. तत्कालीन आमदार विलास लांडे यांच्या उपस्थितीमध्ये या भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, त्यावेळी महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये माजी सैनिक भवनसाठी कोणतेही आरक्षण नव्हते.
दि. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मी आमदार झालो. त्यानंतर दि. २७ ऑक्टोबर २०१५ ते दि. २८ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत सैनिक भवनची निविदा काढण्यात आली. या कामाची वर्क ऑर्डर दि. १ मार्च २०१६ रोजी देण्यात आली. ज्यावेळी या कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी कोणतीही वर्क ऑर्डर नव्हती. कोणतेही काम नव्हते. बजेट नव्हते. निविदा नव्हती. केवळ माजी सैनिकांनी मतदान करावे म्हणून माजी सैनिकांची फसवणूक केली. ज्या माजी सैनिकांनी देशाचे संरक्षण करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले. ज्यांचा संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटतो. त्यांची फसवणूक महाविकास आघाडीतील माजी आमदारांनी केली आहे. कोणतीही निविदा नसताना, दीड वर्ष आगोदर माजी सैनिक भवनाचे भूमिपूजन करण्यात आले.
दिवंगत माजी सैनिक लक्ष्मण उंडे यांचे योगदान…
वास्तविक, महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात नाही. याची माहिती माजी सैनिकांनी घ्यावी. बहुउद्देशीय इमारत असे आरक्षण असताना या ठिकाणी माजी सैनिकांचे भवन झाले. त्याचा ठराव दिंवगत माजी सैनिक आणि माजी नगरसेवक लक्ष्मण उंडे, माजी उपमहापौर हिरानानी घुले, माजी नगरसेवक विकास डोळस, निर्मला गायकवाड यांनी ठराव केला. बहुउद्देशीय इमारतीमध्ये माजी सैनिकांना दोन मजले देण्यात यावेत. त्या भवनाला कर्नल संतोष महाडिक यांचे नाव देण्याचा ठरावही भाजपाच्या सत्ताकाळात मांडला आहे, असा जाहीर खुलासाच आमदार लांडगे यांनी केला.
…. आणि अजित गव्हाणे निरुत्तर झाले!
महेश लांडगे यांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी अजित गव्हाणे यांनी दिघीचा दौरा केला. दिघीच्या वाहतूक समस्येबाबत स्थानिक नागरिकांना आश्वासित केले. दिघीकर खेळाचे मैदान, जलतरण तलाव, उद्यान, कुस्तीचा आखाडा सर्वांपासून वंचित राहीले, असा आरोपही केला. विशेष म्हणजे, ‘‘माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, तर तुम्ही माझा बदललेला मूळ स्वभाव २० तारखेनंतर पुन्हा बघण्याची तयारी ठेवा..’’अशा आमदार लांडगे यांनी दिलेल्या तंबीलाही गव्हाणे यांनी प्रत्त्यूतर दिले. मात्र, माजी सैनिक भवनाच्या मुद्यावर बोलणे टाळले. दिघीत माजी सैनिकांचे मतदान निर्णायक आहे. माजी सैनिकांबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात आदाराचीच भावना आहे. संपूर्ण त्यामुळे महेश लांडगे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत महाविकास आघाडी आणि उमेदवार अजित गव्हाणे यांना कोंडीत पकडले आहे. माजी आमदार विलास लांडे यांचा माजी सैनिक भवनाचा उद्देश निसंशय असेलही, मात्र कार्यपद्धतीत चूक झाली. त्यामुळे गव्हाणे यांना निरुत्तर व्हावे लागले, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.





