Breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

जेजुरी नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले; परंतु नागरी सुविधा, समस्या-विकासाचे काय?

राजकीय वार्तापत्र : आहे तिथेच आम्ही आहोत थांबलेलो, तूर्तास चालण्याची चर्चाच छान आहे!

पुरंदर । विजयकुमार हरिश्चंद्रे 

नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजले असून सत्तेच्या खुर्चीकरिता स्पर्धा सुरू झाली आहे. विचारहीन युती–आघाड्या, मागील निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आणि अगदी चार महिन्यांपूर्वीपर्यंत परस्परांवर राजकीय कुरघोड्या करणारे आता गळ्यात गळे घालून फिरू लागले आहेत. सत्ता नसताना माणसांविना ओस दिसणारी निवासस्थाने सध्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. असेच काहीसे चित्र पुन्हा एकदा निर्माण झाले आहे.

सत्तेसाठी तिकडचे इकडे, इकडचे तिकडे होतील. पदयात्रा, सभा–भाषणे होतील. अर्थकारण गती घेईल. मतदान होईल, निकाल लागेल. पराभूत उमेदवार निमूट घरी जातील, विजयी उमेदवार भंडारा उधळतील. या अर्थपूर्ण उलाढालीतून मतदारराजाचे चार दिवस आनंदात जातील; पण नागरी सुविधा आणि विकासाचे काय? हा प्रश्न पुन्हा पुढील निवडणुकीपर्यंत अनुत्तरितच राहील. पुढील ५० वर्षांच्या भविष्याचा वेध घेऊन येथे विकासाच्या योजना राबवायला हव्यात आणि प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा व्हायला हवा.

कुलदैवत खंडेरायाची जेजुरी नगरी ऐतिहासिक–धार्मिक वारशाने संपन्न आहे. उत्तर दिशेला वाहणारी क-हा माई, तिच्यावर उभारलेला मल्हार सागर जलाशय, शहरातील पेशवे–होळकरांनी निर्माण केलेले तलाव, दक्षिणेकडील जयाद्रीची पर्वतरांग, चारही बाजूंनी पसरलेली शिवमंदिरे आणि पुरातन स्थळे—अशी या नगरीची भौगोलिक रचना लाभदायी असली तरी येथे वर्षानुवर्षे म्हणावा तसा विकास झालेला नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक सत्ता काही मोजक्याच घराण्यांभोवती फिरत राहिल्यामुळे आणि इच्छाशक्तीचा अभाव यांसह इतर कारणांमुळे रस्ते, वीज आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन होऊ शकलेले नाही. भुयारी गटारे, जलनिस्सारण–मलनिस्सारण प्रकल्प, पथदिवे हे प्रश्न नेहमीचेच ठरले आहेत. वाढते नागरीकरण आणि वसाहती पाहता गेल्या ७८ वर्षांत शहराची हद्दही वाढवता आलेली नाही. काही भाग ग्रामीण हद्दीत नाहीत आणि नगरपालिकेच्या हद्दीतही नाहीत, त्यामुळे त्या वस्त्यांतील नागरी सुविधांचा प्रश्न बिकट बनला आहे.

नैसर्गिक वरदान असूनही पर्यटनाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. उत्तर–पूर्व पुरंदरची जीवनवाहिनी असलेला मल्हार सागर जलाशय आटला किंवा दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली की संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडते आणि वीर जलाशयावर अवलंबून राहावे लागते. ही योजना देखील अत्यंत सदोष आहे.

पावसाळ्यात क-हा नदीवरील अतिरिक्त पाण्यातून शहरातील दोन्ही तलाव भरून त्याठिकाणी सुशोभीकरण आणि बोटिंगची सोय करणे पूर्वी शक्य होते. मात्र विकासकामांची ब्लूप्रिंट तयार करण्यास सत्ताधीशांना वेळ मिळाला नाही असेच दिसते. रस्त्यांच्या कामांचा दर्जा पाहिला की ते ठेकेदारांना पोसण्यासाठी की नागरिकांच्या सोयीसाठी—हा प्रश्न निर्माण होतो.

जेजुरीचे अर्थकारण प्रामुख्याने भाविक–भक्तांवर अवलंबून आहे. वर्षभरात आठ ते दहा मोठ्या यात्रा येथे भरतात. शासनाकडून यात्रा अनुदान मिळते, वाहनतळ प्रवेश कर आकारला जातो; पण नगरपरिषदेचा योग्य वाहनतळच नाही. खाजगी वाहनतळांचा आधार घ्यावा लागतो, तेथेही स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. नागरिक आणि भाविकांना अनेक गैरसोयी व अस्वच्छतेचा सामना करावा लागतो.

हेही वाचा    :        जेजुरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाईनी भरला अर्ज! 

ज्या इमारतीत नगरपरिषदेचे संपूर्ण कामकाज चालते, तिची अवस्था सुद्धा दयनीय आहे—तुटलेली स्वच्छतागृहांची दारे, पान–तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले कोपरे आणि उडालेल्या रंगाच्या छतावर जाळ्या. प्रशासनाच्या इमारतीची अशी अवस्था असेल तर शहराची काय अवस्था असेल, याची कल्पना आलीच.

सत्तेमधून अर्थकारण आणि अर्थकारणातून पुन्हा सत्ता—ज्याची आर्थिक क्षमता जास्त त्यालाच प्रतिनिधित्वाची संधी. समाजकारण करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करण्यास कुणाकडेही वेळ नाही. आणि होऊ घातलेल्या निवडणुकीत लोकशाहीच्या उत्सवात अर्थपूर्ण धुळवड होत असताना मतदारराजा मात्र, भविष्याचा विचार न करता चार दिवसांच्या आनंदात रमणार आहे. हेच मागील निवडणुकीत झाले आणि सध्याचेही चित्र वेगळे नाही.

निवडणुकीतील सध्याची राजकीय स्थिती

जेजुरी निवडणुकीसाठी तुतारी, घड्याळ आणि धनुष्यबाण युती झाली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे जयदीप बारभाई यांनी ‘घड्याळ’ हे चिन्ह हाती घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागण्यासाठी जयदीप बारभाई, संदीप जगताप, मनोहर भापकर यांचेसह चार जण इच्छुक होते. नामदार अजित पवार यांनी बारभाई यांना उमेदवारी जाहीर केल्याने संदीप जगताप यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली ऐकला चलो रेच्या भूमिकेत असलेल्या भाजपाने अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही; मात्र अजिंक्य देशमुख, सचिन सोनवणे आणि सुधीर गोडसे ही नावे चर्चेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळालेली नाही. या निवडणुकीत आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने संदीप जगताप यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. आता भाजपा कोणाला उमेदवार करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दोन्ही राष्ट्रवादी गटांची युती झाल्याने आमदार विजय शिवतारे यांचे उमेदवार नगरसेवक पदासाठी मैदानात असतील. देवसंस्थानचे माजी विश्वस्त सुनील असवलीकर काँग्रेसच्या ‘पंजा’ चिन्हावर, तर डॉ. प्रसाद खंडागळे शिवसेना (उबाठा) च्या ‘मशाल’ चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून १० प्रभागांतील २० नगरसेवक पदांसाठी विविध समाजघटकांना उमेदवारी देत मेळ साधल्याचे दिसून येते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button