PUNE: जयाद्री खोऱ्यात डिसेंबरपासून ‘इला उलूक उत्सव’ उत्साहात सुरू!
घुबड संवर्धन, विज्ञान-जनजागृती आणि सर्जनशील उपक्रमांची मेजवानी

पुरंदर : भारताचा पाचवा तसेच सर्वात आधी सुरू होणारा उलूक (घुबड) उत्सव यंदा डिसेंबरपासून जयाद्री खोऱ्यातील पिंगोरी येथे असलेल्या इला फाउंडेशनमध्ये सुरू होत आहे. तीन दिवसीय या विशेष उत्सवात राज्यभरातील विविध शाळांचा सहभाग अपेक्षित असल्याची माहिती जागतिक कीर्तीचे पक्षी तज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी दिली.
२०१९ मध्ये इला फाउंडेशनने जयाद्री खोऱ्यात प्रथमच घुबड उत्सवाचे आयोजन केले होते. या पहिल्याच उत्सवाला जगभरातील तब्बल १९ देशांतील घुबड संशोधक व शास्त्रज्ञांनी भेट देत भव्य प्रतिसाद दिला होता. या उपक्रमाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती.
घुबड हे शेतकऱ्यांचे आणि पर्यावरणाचे विश्वसनीय मित्र असून त्यांच्याबाबत समाजात रूढ असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी फाउंडेशन सातत्याने कार्य करत असल्याचे पक्षीमित्र राजकुमार पवार (जेजुरी) यांनी सांगितले. डॉ. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती मोहिमेला मोठे यश मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
यंदाच्या उत्सवात ‘इला हॅबिटॅट’, पिंगोरी परिसरात घुबडांच्या जीवनशैलीविषयी शास्त्रीय माहिती, छायाचित्रे, पोस्टर प्रदर्शन, कला-नृत्य-नाटिका, सर्जनशील मॉडेल्स, विविध देशांतील घुबडांवरील पुस्तके, चित्रफिती, लघुपट आदी विविध माध्यमांतून माहिती सादर केली जाणार आहे. तसेच राज्य व देशभरातील निसर्गसंवर्धन संस्था, प्राणी-पक्षी अभ्यासक, पर्यावरण अभ्यासक, महाविद्यालये यांचा वाढता सहभाग नोंदवला जात आहे.
उत्सवाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी निसर्ग, सण-उत्सव, पर्यावरण व पक्षी-प्राणी विषयांवर लेखन करणाऱ्या सुरुची पांडे, डॉ. ओंकार सुमंत, राहुल लोणकर, फय्याज शेख, प्रल्हाद जाधव, ऋषिकेश जगताप आणि राजकुमार पवार यांच्याशी संपर्क साधला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“घुबड हा अंधश्रद्धेचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करणारा निसर्गाचा खरा सहकारी आहे. योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचली, तर संवर्धन आपोआप घडते.”
– डॉ. सतीश पांडे, जागतिक कीर्तीचे पक्षी तज्ज्ञ.




