ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

राजीनाम्याची तयारी, अप्रत्यक्षरित्या बंडाचा इशारा, एकनाथ शिंदेंसमोर चॅलेंज

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. त्यानंतर आधी सरकार स्थापनेला विलंब नंतर मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला. मागच्या रविवारी 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला, तर आता नाराजी नाट्याचा अंक सुरु झाला आहे. ज्येष्ठ आमदारांना, माजी मंत्र्यांना पुन्हा संधी मिळाली नाही, म्हणून काही आमदार नाराज झाले आहेत. काल दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा होती. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्याने परंडा येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. आमदार तानाजी सावंत यांना मंत्री करा, म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागणी करण्याचा निर्णय आढावा बैठकीत कार्यकर्त्यांच्यावतीने घेण्यात आला. जर आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्यास दोन दिवसात परंडा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. आढावा बैठकीत परंडा तालुक्यातील 25 सरपंच उपस्थित होते.

अप्रत्यक्षरित्या बंडाचाच इशारा
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत इतके नाराज आहेत की, आजाराचं कारण देत तानाजी सावंत अधिवेशन सोडून तडकाफडकी पुण्याला निघून गेले आहेत. आता नाराजीचा पुढचा अंक म्हणून आमदार तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुक व इतर समाज माध्यमावरील धनुष्यबाणाचे चिन्ह हटवलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला मी शिवसैनिक असं स्टेटस ठेवून सावंत यांनी अप्रत्यक्षरित्या बंडाचाच इशारा दिला आहे.

नव्या चेहऱ्यांना प्राधान्य
तानाजी सावंत यांच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी त्यांनी आणि दीपक केसरकर यांनी जोरदार लॉबिंग केलं, प्रयत्न केले. पण एकनाथ शिंदे यांनी यावेळी नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिलं. रविवारी मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. शिवसेना शिंदे गटाच्या 11 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button