नागपूर विमानतळावर सुषमा अंधारेंला जीवे मारण्याची धमकी
शिवसैनिकांकडून काळजी घेण्याचे आवाहन

नागपूर : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नागपूर विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना ही धमकी देण्यात आली. सुषमा अंधारेंनी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीसीटीव्ही पाहून वस्तुस्थिती तपासावी, असे आवाहनही यावेळी केले.
नेमकं काय घडलं?
सुषमा अंधारे या नागपुरात गेल्या होत्या. आज पहाटे त्या नागपूर विमानतळावरुन मुंबईच्या दिशेने निघाल्या. त्याचवेळी विमानतळावर 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणसाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्या माणसाने जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या, असे सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
सुषमा अंधारेंची पोस्ट
परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालू आहे. अशातच आत्ता 3 वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर विचित्र घटना घडली. मी, माझी 7 वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणुन वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता.
गेटवरील सुरक्षा रक्षक थोडे पुढें सरसावले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला. देवेंद्र जी, आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुपदा वाटले. माञ दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणुन आपल्यापर्यंत पोचवणे ही नागरिक म्हणुन माझी जबाबदारी आहे असे वाटले. टीप शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
शिवसैनिकांकडून काळजी घेण्याचे आवाहन
सुषमा अंधारे यांच्या पोस्टनंतर असंख्य शिवसैनिकांनी यावर कमेंट केली आहे. यावर काही शिवसैनिकांनी ताई काळजी घ्या, हा फार संघर्षाचा काळ आहे. बाकी चार दोन शिवसैनिक कायम आपल्या बरोबर ठेवावेत ही विनंती. जय महाराष्ट्र, असे म्हटले आहे. तर काहींनी घटनेचा जाहीर निषेध, ताई आपण काळजी घ्यावी. आम्ही आपल्या सोबत आहोत, असे म्हटले आहे.