‘झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा’; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
सरकारने संजय राऊतांना तातडीने झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे

मुंबई : राम नवमीच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी राडे आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दंगल उसळली होती. मुंबईतल्या मालवणी परिसरात राम नवमीच्या शोभयात्रेदरम्यान तीन गटांमध्ये राडा झाला. यावरून आता विरोध पक्षाने शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. गृहमंत्र्यांनी झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात दंगली होणं ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मी खासदार संजय राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे. सरकारने संजय राऊतांना तातडीने झेड प्लस सुरक्षा दिलीच पाहिजे. संजय राऊत हे खासदार आहेत, तसेच देशातले मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा प्रदान करायला हवी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी गृह मंत्रालयाची आणि सत्ताधारी लोकांची आहे. कोयता गँग, वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या दंगली, खासदार संजय राऊतांना मिळालेली धमकी या सर्व घटनांमधून गृह मंत्रालयाचं अपयश दिसत आहे. मला वृत्तवाहिन्यांद्वारे अशी माहिती मिळाली की, गृहमंत्रालयाला दंगलीबद्दलचा इंटेलिजन्स रिपोर्ट आधीच मिळाला होता. तरीदेखील हा प्रकार रोखता आला नाही. यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतंय की, राज्यात जे काही घडलं ते गृह मंत्रालयाचं अपयश होतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.





