नागरी सुविधांमध्ये कोणतीही तडजोड नाही: नगरसेविका कविता भोंगाळे-पाटील
PCMC: रखडलेल्या कामांवर तातडीची कारवाईचे निर्देश

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
प्रभागातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि तत्पर नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही सर्वोच्च प्राथमिकता असून, विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा नगरसेविका कविता भोंगाळे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. प्रभागातील विविध नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना प्रलंबित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त वाघमोडे, तसेच स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, विद्युत आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक सागर गवळी आणि जालिंदर शिंदे यांनीही प्रभागातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
बैठकीत दिघी रोडवरील रखडलेली विकासकामे, वारंवार तुंबणारी जलनिस्सारण व्यवस्था, स्टॉर्म वॉटर लाईनची अपुरी क्षमता, खराब झालेले रस्ते, पावसाचे पाणी साचणारे भाग, वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या विविध मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक कामाची सद्यस्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रगतीचा अहवाल मागविण्यात आला.
हेही वाचा – सत्य घटनेवर आधारित “एक होतं माळीण” चित्रपटाचा टीजर लाँच, २४ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
नागरिकांच्या तक्रारींना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व प्रलंबित कामे निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. विविध विभागांनी परस्पर समन्वय साधून विकासकामांना गती द्यावी, तसेच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
यावेळी कविता भोंगाळे-पाटील म्हणाल्या, “प्रभागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक कामावर सातत्याने लक्ष ठेवून प्रशासनाशी समन्वय साधत नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
बैठकीत प्रभागातील सर्व विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि वेळेत कामे पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सर्व मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“प्रभागातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, दर्जेदार आणि वेळेत नागरी सुविधा मिळणे ही आमची जबाबदारी आहे. कोणतेही विकासकाम रखडू देणार नाही किंवा गुणवत्तेशी तडजोड होऊ देणार नाही. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत नागरिकांच्या प्रत्येक समस्येचे वेळेत आणि कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– कविता भोंगाळे-पाटील, नगरसेविका, भाजपा.




