‘राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचेच नेते..’; सुप्रिया सुळे यांचं विधान

मुंबई : अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबे देत सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचेच नेते असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचा पक्ष अजून एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सतेत्त आहे. तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरात ही बैठक झाली. ही गुप्त भेट असल्याचं बोललं गेलं. त्यावर आम्ही गुप्त बैठक करत नाही. चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा – प्रस्तावित कचरा डेपो : पुनावळेकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिलासा!
भाजपने तीनवेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, असा मोठा गोप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला. त्यावर माध्यमांसी बोलताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. अनेकवेळा राष्ट्रवादीला फोडण्याचे प्रयत्न झाले. पण त्यांना अपयश आलं.यावेळी मात्र भाजपला ते शक्य झालं. त्यांना काहीही करुन सत्तेत यायचं आहे. साम दाम दंड भेद असं स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला नाही, असं विधान दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. यावरून त्या म्हणाल्या, या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून पवारसाहेबांनी एकदाही विधानसभा निवडणूक लढवली नाही. इंडिया आघडीतले सगळे लोक आजही पवार साहेबाना नेता मानतात. आमचे आमदार पवारांच्याच नेतृत्वात निवडून येतात. अनेकवेळा आमचा पक्ष राज्यात एक नंबरला होता, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.





