महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्या; राज्य निवडणूक आयुक्तांचे महापालिकांना आदेश

मुंबई: महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घ्या. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील कोणी दुबार मतदान करणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी येथे दिले. मतदार याद्यांबाबत येत्या ८ डिसेंबरला आयोग पुन्हा एकदा आढावा घेणार असून त्यानंतर पालिका निवडणुकीची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह २९ महापालिकांच्या निवडणुकांची तयारी आयोगाने सुरु केली असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच या निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्तांनी आज महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या तसेच निवडणूक तयारी संदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून (व्हीसी) बैठक घेतली. निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महापालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची ३ डिसेंबर पर्यंत मुदत होती. त्यानुसार दाखल हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. तत्पूर्वी सर्व हरकती व सूचनांवर योग्य ती कार्यवाही करून वेळेत निपटारा करावा असे आदेश आयुक्तांनी दिले. संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन योग्य ती दक्षात घ्यावी. संभाव्य दुबार मतदारांची यादी संबंधित महानगरपालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत.
हेही वाचा – एमएमआरडीएने आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावा’; मंत्री नितेश राणे
असा मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे. आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. हमीपत्राबरोबरच त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा द्यावी असे आदेशही वाघमारे यांनी दिले.
या बैठकीत निवडणूक आयुक्तांनी सर्व महापालिकांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना राजकीय दबावामुळे निर्णय घेण्यात अडचणीत येत असल्याच्या तक्रारी काही पालिका आयुक्तांनी केल्या. काही ठिकाणी विधानसभा निवडणुकीनंतर मतदार ते ठिकाण सोडून अन्यत्र गेला आहे. किंवा इमारत पुनर्विकासासाठी पाडली गेली आहे. इमारत धोकादायक झाल्याने त्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. अशा ठिकाणी स्थानिक राजकीय नेतृत्व हे मतदार आपल्यात प्रभागत रहावेत किंवा नव्या ठिकाणी गेलेत तेथेच मतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यासाठी आग्रह धरतात. अशावेळी प्रशासनाची कोंडी होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यावर नियमानुसार त्या मतदाराने विधानसभा निवडणुकीत मतदान केले असेल तेथेच त्याचे मतदार यादीत नाव असावे. त्याची इमारत खाली केली असेल किंवा तोडली असली तरी त्याने अर्ज केल्याशिवाय मतदार यादीतील नाव बदलता येणार नाही अशा सूचना आयुक्तांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जावी अशा सूचना सचिव सुरेश काकाणी यांनी दिल्या. विधानसभा निवडणूक मतदार यादीचे केवळ महानगरपालिका निवडणुकासाठी प्रभागनिहाय विभाजन केले जाते. मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. कायद्यातील तरतुदीनुसार या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या तारखेला अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.





