‘इन्फिनिक्स कॅम्पस कनेक्ट’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
१३८ विद्यार्थ्यांचा सहभाग; ई-स्पोर्ट्समधील करिअर संधींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे | डिजिटल युगातील ई-स्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी गेमफोर्ज ई-स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित ‘इन्फिनिक्स कॅम्पस कनेक्ट’ हा उपक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील १२ नामांकित महाविद्यालयांतील तब्बल १३८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या गेमिंग कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेचे मुख्य आकर्षण ‘कॉल ऑफ ड्युटी (मोबाईल)’ ही गेमिंग स्पर्धा ठरली. सुमारे १५ हजार रुपयांचे बक्षीस आणि आकर्षक भेटवस्तू जिंकण्यासाठी सहभागी खेळाडूंमध्ये चुरशीची लढत रंगली.
हेही वाचा : पुण्यात झालेल्या पावसामुळे प्रशासनाचे अपयश अधोरेखित; शिवसेना नेते आदित्य ठाकरे
कार्यक्रमाला ‘फ्री फायर’चे प्रसिद्ध कास्टर वेद भाकडे तसेच लोकप्रिय कंटेंट क्रिएटर जय भांगर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी विद्यार्थ्यांना ई-स्पोर्ट्स क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे डायरेक्टर डॉ. बी. बी. वाफारे, डीन-स्टुडंट अफेयर्स डॉ. सुनील महाजन आणि प्रा. जयवंत भूमकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी प्रतिनिधी मधुर घाटे (अध्यक्ष) आणि शिवम सामंत (उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. गेमिंगसोबतच नेटवर्किंग आणि नव्या गोष्टी शिकण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याची भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.




