TOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवडराजकारण

महसूलवाढ, नागरी सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासाला स्थायी समितीची गती

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती कटिबद्ध : सभापती अभिषेक बारणे

पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महसूलवाढ, दर्जेदार नागरी सुविधा, सक्षम आरोग्य सेवा, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकहिताला प्राधान्य देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे अनेक धोरणात्मक निर्णय घेत स्थायी समितीने विकासकामांप्रती आपली कटिबद्धता अधोरेखित केली.

हेही वाचा – स्टेला सोसायटी, डुडूळगाव येथील पाणीपुरवठा होणार लवकरच सुरळीत!

सभेच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सभापती अभिषेक बारणे यांनी अजितदादांच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या अकस्मात जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी आजही जाणवत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्थायी समिती सदस्य विकास साने, बाबासाहेब त्रिभुवन, सुलभा उबाळे आणि शालिनीताई गुजर यांनीदेखील अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले.

सभेत शहरातील ८० उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांवरील जाहिरात हक्क १० वर्षांच्या कालावधीसाठी ई-लिलावाद्वारे देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे महापालिकेच्या महसूलात दीर्घकालीन वाढ होणार असून ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (CPI) दरवर्षी उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील दिशादर्शक फलकांवरील जाहिरात हक्क पाच वर्षांसाठी देण्यासही मंजुरी देण्यात आली. या दोन्ही निर्णयांमुळे महापालिकेच्या कायमस्वरूपी महसूल स्रोतांना मोठी चालना मिळणार आहे.

महापालिकेच्या विविध विभागांतील संगणक प्रणालीची अखंडित देखभाल व दुरुस्ती सुरू राहण्यासाठी नवीन एजन्सीची नियुक्ती होईपर्यंत विद्यमान एजन्सीला मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील शवागाराच्या कोल्ड स्टोरेजसाठी वार्षिक देखभाल व दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. तसेच महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिका सेवा व इतर वैद्यकीय कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने ३७ वाहनचालक उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक १० मधील संभाजीनगर येथे स्टॉर्म वॉटर लाईन उभारणीच्या कामास मंजुरी देण्यात आली. तसेच अर्बन स्ट्रीट डिझाईन संकल्पनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या पदपथांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे शहरातील पादचारी सुविधा अधिक सुरक्षित व सुस्थितीत राहणार आहेत.

एचआयव्ही/एड्स बाधित नागरिकांना पीएमपीएमएलच्या मोफत बस पास योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच महापालिकेच्या उर्दू माध्यम बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य खरेदीवरील खर्चाचे अवलोकन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक १८, चिंचवड येथील विकास आराखड्यातील मिसिंग लिंक व इतर रस्ते विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. चऱ्होली येथील मैलाशुद्धीकरण केंद्रांच्या संचालन, देखभाल व दुरुस्तीच्या कामांनाही मान्यता देण्यात आली. नवीन ‘ज’ (लोहगड) आणि ‘ल’ (रायगड) क्षेत्रीय कार्यालयांसाठी आवश्यक कार्यालयीन फर्निचर खरेदीस कार्योत्तर मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ११, १२ तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील जलनिःसारण नलिका, चेंबर्स आणि संबंधित देखभाल-दुरुस्तीच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. अग्निशामक विभागासाठी स्मार्ट गार्ड कटर उपकरण खरेदीस मान्यता देण्यात आल्याने आपत्कालीन बचावकार्य अधिक प्रभावी व जलदगतीने करता येणार आहे. बीआरटी कॉरिडॉर क्रमांक ३ वरील रेलिंग दुरुस्ती आणि बीआरटी बसथांब्यांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.

पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पारंपरिक इंधनावरील रिक्षांचे अधिकृतपणे ई-रिक्षामध्ये रूपांतर (रेट्रोफिटमेंट) करणाऱ्या रिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका सभेकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दापोडी येथे नवीन तलाठी कार्यालयासाठी महापालिकेची जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावालाही महापालिका सभेकडे शिफारस करण्यात आली.

खासगी गृहनिर्माण प्रकल्पांमधील मैलाशुद्धीकरण केंद्रांतील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वाढविणे आणि उर्वरित पाण्यासाठी जलनिःसारण जोडणीसंदर्भातील धोरणात्मक प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे जलसंवर्धनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

“पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांच्या उभारणीपुरता मर्यादित नसून, तो नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याशी निगडित आहे. महापालिकेच्या महसूलवाढीस चालना देणारे निर्णय घेत असतानाच आरोग्य सेवा, पर्यावरण संवर्धन, वाहतूक व्यवस्था, जलनिःसारण, सामाजिक न्याय आणि शाश्वत विकास यांनाही आम्ही समान प्राधान्य देत आहोत. विकासकामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि नागरिकहित हीच आमची भूमिका असून, पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण आणि लोकाभिमुख विकासासाठी स्थायी समिती कटिबद्ध राहील. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहराच्या जडणघडणीत दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या विकासदृष्टीला पुढे नेत नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”
— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button