“तर राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होतील आणि उद्धव…”; नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

Narayan Rane : विधिमंडळाचे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्ती निर्णयाचा जीआर रद्द करत असल्याचे जाहीर केले. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे हे दोन्ही नेते विजय मेळाव्यात एकत्र पाहायला मिळणार आहे. ५ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी ठाकरे गटासह मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या चर्चांनी ट्विस्ट निर्माण झाला असतानाच भाजप नेते नारायण राणेंनी आता राज ठाकरेंबाबत आणि शिवसेनेबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे.
“राज ठाकरे जर शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आले तर ते प्रमुख होतील आणि उद्धव ठाकरे नगण्य राहतील. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच ओरिजनल आहे. मराठी आणि हिंदुत्वावर बोलायचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही, दोघांची संख्या काय आहे?” अशी विचारणा नारायण राणे यांनी केली.
पुढे ते म्हणाले, “ठाकरे कुटुंबांबद्दल मला काही बोलायचं नाही. पण राज ठाकरेंना घराबाहेर जायला का प्रवृत्त केलं? हा प्रश्न आहे. हा विजय नको त्या विषयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे. तसेच ते जर एकत्र असते तर वेगळे झाले असते का? यांना आता मराठी माणूस आठवला. मराठीसाठी शिवसेना मग मराठी माणसं गेली कुठे? अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले. काय केलं मराठी माणसांसाठी?,” असा सवालही राणेंनी केला.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींना घानाचा राष्ट्रीय सन्मान प्रदान….
“शिवसेनेच्या नावावर उद्धव ठाकरेंनी उदरनिर्वाह केला. पण ओरिजनल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. ठाकरेंकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. सध्याच्या घडीला राज्यातील महायुती सरकारला घेरण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही, आम्हाला त्रास काही नाही. दोन भावांनी एकत्र यावं, आम्हांला काही चिंता नाही. यांना आम्ही गिणतीत धरत नाहीत. कोणी कुठे जायचे हा ठाकरेंचा वैयक्तिक प्रश्न असून राज ठाकरेंना ते शिवसेनेत या असं हे कधीच म्हणू शकत नाही,” असा हल्लाबोलही राणे यांनी केला.
“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचं महत्त्व नाही. त्यांनी महाराष्ट्र, मराठी माणूस, तरुणांच्या नोकरीसाठी काय केलं? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली. शिवसेनेने त्यांच्या नावावर उदरनिर्वाह चालवला. मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही,” असा हल्लाबोलही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.