पंतप्रधान मोदींचा मास्टर स्ट्रोक! शशी थरूर, सुप्रिया सुळे यांच्यावर विशेष जबाबदारी

Operation Sindoor | काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ६ आणि ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उडवले. यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मात्र, यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मंचावर ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या फेक नॅरेटिव्हचा पर्दाफाश करण्यासाठी भारत सरकारने विशेष योजना आखली आहे.
मोदी सरकारने यासाठी ७ खासदारांचे सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ तयार केले आहे. या मोहिमेत काँग्रेस खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाराष्ट्रातील शिवसेनेचे श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे प्रतिनिधीमंडळ २२ मे नंतर अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे.
हेही वाचा : मुंबई विमानतळावरून आयएसआयएसशी संबंधित दोघांना अटक
प्रतिनिधीमंडळात कोण?
- काँग्रेस : शशी थरूर
- भाजप : रविशंकर प्रसाद, बैजयंत पांडा
- जनता दल युनायटेड : संजय कुमार झा
- द्रमुक : कनिमोळी करुणानिधी
- राष्ट्रवादी काँग्रेस : सुप्रिया सुळे
- शिवसेना : श्रीकांत एकनाथ शिंदे
दरम्यान, सदर यादीमध्ये अजून काही नावे जोडली जाऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं आहे. सध्याच्या यादीमध्ये सुप्रिया सुळेंबरोबरच श्रीकांत शिंदे असे महाराष्ट्रातील दोन खासदार या यादीत आहेत.