‘पुण्यात बदल होतोय याचा अर्थ..’; शरद पवारांचं सूचक विधान
![Sharad Pawar said that people will definitely think while voting in the future](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Sharad-Pawar-780x470.jpg)
आगामी काळात लोक मतदान करताना लोक नक्कीच विचार करतील
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांच्या निकालाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयी झाल्या. तब्बल २८ वर्षानंतर भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात महाविकास आघाडीने विजय मिळवला. यावरून विरोधाकांकडून कसब्यातील विजयावरून भाजपाला घेरलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे. तीन राज्यांच्या निवडणुका, पुण्यातील पोटनिवडणूक, काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक संस्थेच्या निवडणुका, विधानपरिषद निवडणूक, या निवडणुकांचे निकाल हेच सांगत आहेत. केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, प.बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा नाही. कर्नाटकात आमदार फोडून भाजपानं सत्ता मिळवली. आगामी काळात मतदान करताना लोक याचा नक्कीच विचार करतील, असं शरद पवार म्हणाले.
हा बदल आहे. आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरून तर फक्त दोन ठिकाणी भाजपाला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजपा मागे आहे, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मतं मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत हे स्पष्ट होतंय, असंही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं उमेदवारी दिली. त्या निवडूनही आल्या. मात्र, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर नेते राहुल कलाटे यांनाही भरघोस मतं मिळाली आहेत. या दोघांच्या मतांची बेरीज अश्विनी जगताप यांच्यापेक्षाही जास्त असल्याचा दावा करत विरेधकांकडून हा भाजपाचा नैतिक पराभवच असल्याची टीका केली जात आहे.