उद्योगमंत्री दावोसला गुंतवणुकीसाठी गेले की लोकं फोडायला? शरद पवारांचा पलटवार

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार आणि १० माजी आमदार आणि काँग्रेसचे ५ आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता. यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होतो की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरून शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, की मी उदय सामंत यांचे विधान ऐकले. दावोस येथे ते गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की, पक्ष फोडण्यासाठी गेले होते? दावोस येथे त्यांनी केलेली विधाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा जो उद्देश होता, त्याच्याशी सुसंसगत नव्हती. काही खासदारांचे फोटो मी पाहिले. तरीही ते लोक ठाकरेंची शिवसेना सोडतील, असे मला अजिबात वाटत नाही. कारण हे लोक वाटेल ते करतील पण बाळासाहेबांची विचारधारा सोडणार नाहीत.
हेही वाचा : दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकाच परदेशी कंपनीचा महाराष्ट्राशी करार : शरद पवार
दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केलेला आहे. २८ भारतीय कंपन्यांनी सामंजस्य करार केला, त्यातील २० कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही १५ मुंबईतील आहेत. अशी माहिती आता समोर येत असल्याचेही शरद पवार म्हणाले. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते, मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. तिथून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा दिखावा केला गेला, असेही शरद पवार म्हणाले.





