‘उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती’; फडणवीसांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर
![Sanjay Raut said that Uddhav Thackeray had offered Fadnavis the post of Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/sanjay-raut-devendra-fadnavis-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय आहे
मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी फोन करून मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर, घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होते तेव्हा अशावेळी विरोधी पक्ष किंवा सरकार बनवू इच्छिता त्यांच्याशी बोलले असतील, बोलले होते. ठीक आहे, पण देवेंद्र फडणवीस इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करून काय सांगू इच्छित आहेत, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, मात्र आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि किती काळ या पदावर राहतील हे सांगता येत नाही. हे सर्व दिल्लीच्या मर्जीप्रमाणे आहे. फडणवीसांनी या सनसनाटीचा आनंद घ्यावा, असंही राऊत म्हणाले.