‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार’; जयंत पाटलांच्या विधानावर संजय राऊत म्हणाले..

मुंबई : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. या विधानवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, त्यासाठी आपण आधी एकत्र बसू.. मग सत्ता येईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल. या बैठकीनंतर नक्कीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, याबाबत काहीही दुमत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणं, हा निर्णय देखील महाविकास आघाडीचाच होता. अशाप्रकारे निर्णय भविष्यात घेतले जातील.
भाषणात आपण तसं बोलत असतो. त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलतील.. काँग्रेसच्या मेळाव्यात नाना पटोले बोलतील आणि आमच्या मेळाव्यात आम्ही बोलू..पण महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही एकत्र बसतो, तेव्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, अशी आमची भाषा असते, असंही संजय राऊत म्हणाले.





