मोदी मोठे वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा; राऊतांचा टोला

मुंबई | अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू लागली आहे. राज्यात व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिल्यास पेट्रोल-डिझेलचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत खोचक शब्दांत टीका केली.
खासदार संजय राऊत म्हणाले, की मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आणि संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करता येते. नाल्यामध्ये पाइप टाकायचा आणि त्यामधील गॅसवर आपल्या घरातील चुली पेटवता येतात. हा त्यांचा शोध आम्हाला आठवला आहे.
हेही वाचा : ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.३९ कोटींची फसवणूक
आम्ही असा विचार करत आहोत की, नाल्यातून गॅस निर्मितीच्या पहिल्या प्रकल्पाचं उद्धाटन हे मिठी नदीच्या… मिठी नदीच्या किनाऱ्यावर अशा प्रकारच्या गॅस निर्मितीचा प्रकल्प नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का? आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी मग देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदी यांनाच बोलवावं. त्यातून देशभरात असे अनेक उद्योग तयार होतील. आखाती युद्धामुळे गॅसची जी टंचाई निर्माण झाली आहे, ती आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल. पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईत मिठी नदीवर करावं, असं संजय राऊत म्हणाले.
या प्रकल्पासाठी किती पाइप लागणर आहेत त्याची व्यवस्था शिवसेना म्हणून आम्ही करायला तयार आहोत. कारण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, असेही संजय राऊत म्हणाले. मोदींचे जे स्वप्न आहे की नाल्यातून आपण गॅस निर्मिती करू, ते जर आखाती युद्धामुळे जर पूर्ण होत असेल तर आम्हा त्यासंदर्भात पुढचं पाऊल टाकायला तयार आहोत, असेह राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य आहे. याचा फटका शेतकऱ्यांना, कष्टकरी, मजूर, हॉटेल उद्योग, मोटार उद्योग, टाईल्स उद्योग, इंजिनियरिंग उद्योगाला बसतो आहे. अशा वेळेला मोदींनी केलेलं नाल्यातून गॅस निर्मितीचं संशोधन वाया जाऊ नये अशी आमची भूमिका आहे, असेही संजय राऊत म्हणाले.





