‘EVM है तो मोदी है’; खासदार संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएम व चंदीगडमधील घडामोडींचा संदर्भ देत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपा हा डरपोक पक्ष आहे. लोकांमध्ये जायची त्यांच्यात हिंमत नाहीये. इव्हीएम किंवा चंदीदड पॅटर्न नसेल, तर भाजपा जिंकू शकत नाही. उत्तर प्रदेशच्या चंदौलमध्ये एका दुकानात २०० इव्हीएम मशीन मिळाल्या आहेत. तो भाजपाचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये एका ट्रकमध्ये ३००हून जास्त इव्हीएम मशीन सापडल्या. तो ट्रकही भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. हा काय खेळ आहे? असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा – संसदेत धुडगूस आणि गदारोळ करणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल!
इव्हीएम बनवणाऱ्या सरकारी कंपनीवर (भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड) भाजपाचे चार संचालक नियुक्त केले गेले. इव्हीएममधला गुप्त कोड तिथेच तयार होतो. पण संचालकांपैकी बहुतेक संचालक गुजरातचे आहेत. २०२४ मध्ये कशा प्रकारे निवडणुका लढवल्या जातील, त्याची ही तयारी आहे. दोन पॅटर्न आहेत. एक मनसुखभाई पॅटर्न, जे इव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचे संचालक झाले आहेत. दुसरा चंदीगड फॉर्म्युला. तिथे काँग्रेस व आपण निवडणूक जिंकली. पण तरीही भाजपा हे मानायला तयार नाही. मतपत्रिकांचं अपहरण केलं गेलं आणि ते गादीवर बसले, असं संजय राऊत म्हणाले.
या देशात भाजपा सरळ लोकशाहीच्या मार्गानं कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही. ईव्हीएम हटली तर भाजपा गेली. इव्हीएम है तो मोदी है. चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत होतं. दोघांच्या मिळून २० जागा होत्या. भाजपाकडे १४ जागा होत्या. मतदान आप व काँग्रेसच्या बाजूने झालं. पण तरीही पीठासीन व्यक्तीनं ८ मतं बाद केली. विजयी होत असलेल्या काँग्रेस-आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून भाजपाचा महापौर विजयी ठरवला. हा चंदीगड पॅटर्न भाजपानं आणला आहे. आम्ही वाचलं होतं की सीतेचं अपहरण रावणानं केलं. पण चंदीगडमध्ये लोकशाहीरुपी सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.




