ICC चा बांगलादेशला दणका! थेट वर्ल्ड कपमधूनच केलं बाहेर; ‘या’ संघाला मिळाली संधी

Scotland replaces Bangladesh T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे.
सुरक्षेचे कारण पुढे करत भारतात येण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशच्या संघाला वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यात आले असून, त्यांच्या जागी आता स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे.
आगामी टी-२० वर्ल्ड कपचे यजमानपद भारताकडे आहे. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपल्या खेळाडूंना भारतात पाठवण्यास स्पष्ट नकार दिला होता. बांगलादेशची मागणी होती की, त्यांचे सामने भारताबाहेर आयोजित करावेत किंवा त्यांचा गट बदलावा. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली. दोन्ही पक्षांमध्ये तडजोड न झाल्यामुळे अखेर आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाद करून स्कॉटलंडला संधी दिली आहे.
हेही वाचा –बदलापूर घटनेनंतर गृह व शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा! सर्व पूर्व प्राथमिक शाळा…
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या विवाद निवारण समितीकडे धाव घेऊन भारताबाहेर सामने घेण्याची विनंती केली होती. मात्र, हे प्रकरण त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे सांगत समितीने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आयसीसीने अधिकृतपणे बांगलादेशला वगळण्याचा निर्णय घेतला.
आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी बोर्डाला पत्र लिहून स्पष्ट केले की, “बांगलादेश क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या नियमांचे पालन करत नाहीये. अशा परिस्थितीत आमच्याकडे दुसऱ्या संघाला बोलावण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.” त्यानंतर स्कॉटलंडला अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले.




