‘देशाचा पुढचा अर्थसंकल्प मीच मांडणार…’; संजय राऊतांचं विधान चर्चेत

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून देखील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे. देशाचा पुढचा अर्थसंकल्प मीच मांडणार, असं ते म्हणाले. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
खासदार संजय राऊत हे कारमध्ये बसताना त्यांना पत्रकार विचारतो, तुमच्या हातातली बॅग अर्थसंकल्पाची बॅगच वाटते आहे. त्यावर संजय राऊत म्हणतात, पुढचा अर्थ संकल्प मलाच मांडायचा आहे, देशाचा. हे नीट लक्षात घ्या तुम्ही, असं म्हणून ते मिश्किल हसत संजय राऊत कारमध्ये बसले आणि पुढे गेले. संजय राऊत यांचं हे वक्तव्य मिश्किल असलं तरीही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याआधी राष्ट्रपतीपदासाठी मला विचारणा’; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर आणि अशोक चव्हाणांवर टीका केली. भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन तुम्ही ४०० (लोकसभेच्या जागा) पार करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचं स्वप्नभंग होईल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही घाबरलेले आहात. तुम्ही लटपटत आहात. एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणांना घ्यावं लागतंय. मोदींचा चेहरा एवढा तेजस्वी आणि प्रखर आहे. नरेंद्र मोदी हे विष्णूचा तेरावा अवतार आहेत ना, प्रभू श्रीरामाचं बोट धरून जात आहेत, पण शेवटी त्यांना अनेक असे छोटेमोठे रावण घेऊन २०२४ च्या निवडणुका जिंकण्याची वेळ आलीय, हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड आहे, असं संजय राऊत म्हणाले.





