‘इटलीतून हद्दपार ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’मधील घातक रसायनासंदर्भात सरकारने मागितले केंद्र सरकारचे मार्गदर्शन’; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे

मुंबई : इटलीने हद्दपार केलेली मिटेनी एसपीए ही कंपनी रत्नागिरीतील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत सुरू असून त्यातून पीएफएस संवर्गातील घातक रसायनाची निर्मिती होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या कंपनीने संबंधित घातक रसायनाचे उत्पादन तीन महिन्यांपूर्वी बंद केले आहे.
तोपर्यंत या घातक रसायनाचे ३१.३७ मेट्रिक टन उत्पादन झाल्याची कबुली पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. या पीएफएसचे उत्पादन आणि त्याची साठवण, हाताळणी, प्रक्रिया आणि विल्हेवाट यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण मंडळाला पत्र लिहून मार्गदर्शन मागितल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
रत्नागिरी येथील परशुराम लोटे परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून उत्पादन होत असलेल्या घातक रसायनासंदर्भात भाई जगताप, निरंजन डावखरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी इटलीमधून हद्दपार केलेली मिटेनी एस.पी.ए. ही रासायनिक कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक या नावाने सुरु करण्यात आली असल्याबाबतची माहिती उपलब्ध नाही.
मात्र मे. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी लोटे परशुराम येथील औद्योगिक वसाहतीत सुरू असल्याची माहिती दिली. यावर संबंधित कंपनी कशाप्रकारे इटलीहून कशाप्रकारे भारतात आली आणि लक्ष्मी ऑरगॅनिक म्हणून कार्यरत झाली याविषयीची सविस्तर माहिती निरंजन डावखरे यांच्याकडून मांडण्यात आली. मंत्री पंकजा मुंडे यांनी कंपनीच्या स्थापनेसंदर्भातील बाब पर्यावरण विभागाच्या अखत्यारितील नसल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा – ‘बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उत्पादनासंदर्भात माहिती देताना लक्ष्मी ऑरगॅनिकडून ८५०० मेट्रिक टन इतक्या उत्पदनासाठी पर्यावरण अनुमती मार्च २०२० मध्ये घेतली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्रकल्पासाठी फेब्रुवारी २०२१ रोजी संमतीपत्र देण्यात आले. या कंपनीने आपल्या अनुमतीचे हस्तांतरण यलास्टोन फाईन केमिकल्स प्रा.लि. नावाने करून उत्पादन सुरू करण्यासाठी जुलै २०२३ रोजी घेतली असून ३० जून रोजी त्याची वैधता संपत असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित कंपनीने डिसेंबर २०२३ मध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू केले. कंपनीकडून सुरुवातीला कृत्रिम सेंद्रिय रसायनांचे उत्पादन चालू करण्यात आले आणि जून, २०२५ मध्ये पीएफएएस संवर्गातील पोटॅशियम नॅनोफ्लुरोब्युटेन सल्फोनेट (आरएम-६५) या रसायनाचे उत्पादन सुरू करण्यात आले. पीएफएस संवर्गातील रसायनाचे ३१.३७ मेट्रिक टन उत्पादन करण्यात आले. या रसायनाचे उत्पादन २२ डिसेंबरपासून बंद करण्यात आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
संबंधित पीएफएस रसायनाच्या उत्पादनाची परवानगी नाकरण्याचे कोणतेही निकष नाहीत. हे रसायन नॉन स्टिक कुकवेअर, सौंदर्य प्रसाधने आणि इलेक्ट्रिकल वायर्सच्या निर्मितीत वापरले जात असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. कंपनीने केलेल्या उत्पादन आणि सांडपाण्यातील त्याचे प्रमाण याबाबत पर्यावरण विभागाच्या सात सदस्यीय समितीने केली असता कोणतेही नुकसान आढळले नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
संबंधित पीएफएस या घटकाचे व त्यापासून निर्माण होणाऱ्या औद्योगिक सांडपाण्याची साठवण, हाताळणी, प्रक्रिया आणि विल्हेवाट याच्या तपासणीसाठी रसायन तंत्रज्ञान संस्थेची (आयसीटी) नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीचा अहवाल पुढील दोन महिन्यांत येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रान्वये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मार्गदर्शन मागविले आहे. याबाबतचा पाठपुरावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येत असल्याचे मुंडे म्हणाल्या.





