“मुख्यमंत्री फडणवीसांनी जनतेची माफी मागावी”; नसरापूर प्रकरणावरून संजय राऊतांची टीका

मुंबई | पुण्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली.
संजय राऊत यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, गृहमत्री म्हणून जी कर्तव्य पार पाडायला हवीत ती पार पाडली जात नाहीत. सातत्याने मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे वाढली आहेत. मुख्यमंत्री २४ तास राजकारणात अडकले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा
दिल्लीतील विवेक विहारमध्ये भीषण आग; नऊ जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी
काल मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी ट्राफिक जाम झाले, लोकांचे हाल झाले. मुख्यमंत्र्यांनी विनम्रपणे माफी मागितली. कालच्या (नसरापूर बलात्कार प्रकरण) प्रकरणाबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. मुलींवरील, महिलांवरील अत्याचारसंदर्भात माफी मागायला पाहिजे. त्या कालच्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल, तिच्या खात्यात १५०० रुपये फडणवीस टाकत असतील. त्या बहिणीच्या मुलीवर अशाप्रकारे बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार दिला आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
हे या राज्यात सुरू आहे. या महाराष्ट्रातील आणि भगिंनीनी सरकारविरोधात बंड केलं पाहिजे. या सरकारला जाब विचारला पाहिजे. विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरलं पाहिजे. हे राज्य आता सामान्य माणसाला राहण्यालायक उरलं नाही. पैशांचा माज, पैशांची मस्ती आणि सत्ता यावर सरकार चाललं आहे. धाक नसल्याने अत्याचार सुरू आहेत. याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असंही ते पुढे म्हणाले.





