‘भाजप एकनाथ शिंदेना प्रधानमंत्री करणार’; संजय राऊतांचा खोचक टोला
![Sanjay Raut said that BJP will make Eknath Shinde the Prime Minister.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Sanjay-Raut--780x470.jpg)
Sanjay Raut | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले आहेत. मात्र, महाराष्ट्राला अद्याप मुख्यमंत्री मिळालेला नाही. मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम आहे. भाजपाकडून मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच असतील असे सूचक संकेत दिले जात आहेत. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, की तीन पक्षांच्या युतीला सैतानी बहुमत मिळालं आहे. भाजपाला मित्र पक्ष मिळून १४० जागा मिळाल्या आहेत. एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा एकमेकांच्या तंगड्यांमध्ये तंगडं अडकवण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरु आहे.
दिल्लीश्वरांनी जे बंडखोर तयार केले जी भुतं तयार केली ती आधी दिल्लीने डोळे वटारले की गप्प बसायचे. आता ही भुतं त्यांना घाबरत नाहीत असं दिसतं आहे. ही भुतं आता मोदी आणि शाह यांनाच आव्हान देत आहेत. त्यामुळे सरकार कधी येईल? मुख्यमंत्री राज्याला कधी मिळेल ? या प्रश्नांबाबत राज्यात संभ्रम आहे. आम्हाला अपेक्षा आहे की लवकरच महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल आणि सरकारचा कारभार सुरु होईल, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – ‘अजित पवारांमुळे आमची ताकद कमी झाली’; रामदास कदम यांची टीका
भाजपाला पाशवी यश मिळालं आहे. असं पाशवी यश देशाला आणि राज्याला घातक असतं. यामुळे भ्रष्टाचार वाढतो, हुकूमशाही वाढते. भाजपाने कुणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्राला सरकार मिळालं पाहिजे जनतेची अपेक्षा आहे ती चुकीची नाहीत. लाडक्या बहिणी २१०० रुपये कधी मिळणार त्याची वाट बघत आहेत. शेतकरी कर्ज माफीची वाट बघत आहेत. बेरोजगार नोकरी मिळण्याची वाट बघत आहेत त्यामुळे सरकार लवकर स्थापन झालं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंना केंद्रात गृहमंत्री करतो असं आश्वासन दिलं गेलं असेल. १४० जागा भाजपाकडे आहेत त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचा होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंना भविष्यात पंतप्रधान करतो असंही आश्वासन दिलं गेलं असेल असा टोलाही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.