अमित शाहांना शिवसेना आणि महाराष्ट्राचा द्वेष; संजय राऊत यांची टीका

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘शिवसेनाप्रमुख’ असा केल्यानंतर राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. यावर शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अत्यंत जळजळीत शब्दांत टीका केली आहे. “अमित शाह यांच्या पोटात महाराष्ट्र आणि शिवसेनेबद्दल जे विष आहे, तेच त्यांच्या ओठांवर आले आहे,” असा घणाघात राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. तसेच, अमित शाह हे खासदारांना फोडून भविष्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, की अमित शाह यांच्या दबावामुळे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह मिंधे गटाला दिलं. अमित शाह यांच्या दबावामुळे सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही. अमित शाह यांच्या दहशत आणि दबावामुळे सातत्याने शिवसेना फोडण्याची प्रक्रिया सुरु आहे. अमित शाह जे बोलले ते त्यांच्या पोटातलं विष ओठांवर आलं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख आहेत असं अमित शाह म्हणाले. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना दिली. त्यामुळे या महाराष्ट्राचं नुकसान झालं. तरीही कुणी अमित शाह यांच्या नावे कुणी टाळकुटेपणा करत असेल तर ते आपल्या आईशी आणि मातीशी गद्दारी करत आहेत.
हेही वाचा
अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी ६ व्या ‘स्माईल सायक्लोथॉन’चे आयोजन
अमित शाह हे एक व्यापारी आहेत. त्यांचा मूळचा उद्योग शेअर बाजारात पैसे गुंतवणं आणि शेअर्सचे दर वर खाली करणं हा अमित शाह यांचा मूळ व्यवसाय आहे. बाकी सहकार वगैरे सगळं ढोंग आहे. अमित शाह यांनी देशात अराजक निर्माण करण्याची सुपारी घेतली आहे. कुणाकडून घेतली आहे ते भविष्यातला काळ ठरवेल. ज्या पद्धतीने देशातल्या प्रादेशिक पक्षांमधले खासदार फोडून ते आपल्या पाठिशी उभे करुन भविष्यात नरेंद्र मोदींना आव्हान देण्याचं त्यांचं जे षडयंत्र आहे त्यात त्यांनी एकनाथ शिंदेंसारख्या लोकांना सामील करुन घेतलं आहे. उद्या ते या खासदारांच्या बळावर ते मोदींच्या विरोधात बंड करु शकतात, असाही गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून खासदारांवर कुठलेही निर्देश आलेले नाहीत.हे खासदार ज्या गटात जाऊ इच्छितात त्या मिंधे गटाकडूनही हे पाच किंवा सहा खासदार आमच्याकडे येणार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य आलेलं नाही. या सर्व खासदारांनी आत्तापर्यंत आम्ही शिवसेना सोडली आहे असं जाहीर केलेलं नाही. व्हीपचं उल्लंघन करुन ते आमच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत हे खरं आहे. त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. काही खासदार आमच्या संपर्कात आहेत, त्यांनी हे सांगितलं आहे की आम्ही शिवसेनेच्या बरोबर आहोत. अशा खासदारांशी चर्चा करणं यात काही चूक नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.





