‘वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं, आता..’; संजय राऊतांची सरकारवर टीका

मुंबई | राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी सात आमदारांनी मंगळवारी शपथ घेतली. या शपथविधीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच, सांगली महापालिकेत वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल नियुक्त आमदार करता आणि त्याच्या मांडीला मांडी लावून बसता, असं संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत म्हणाले, की निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सात आमदारांना शपथ देण्याचा जो निर्णय घेतला, तो घटनाबाह्य आहे. मुळात पहिली यादी राजभवनात प्रलंबित आहे. ही यादी ठाकरे सरकारने पाठवली होती. त्यातील नावांची चौकशी तेव्हाच्या राज्यपालांनी केली होती. मग आता जी सात नावं पाठवण्यात आली, त्यांच्या संदर्भात राज्यपालांनी कोणती चौकशी केली? ज्यांनी शपथ घेतली, ते सर्व राजकीय कार्यकर्तेच आहेत. त्यात धर्मगुरुही आहे. त्यातले एक सदस्य इद्रीस नायकवाडी त्यांचा इतिहास काय? तर त्यांनी वंदे मातरमला विरोध केला होता.
हेही वाचा – Breaking News | भोसरीत गजबजलेल्या आळंदी रोडवरील पेट्रोल पंपावर कारला भीषण आग
सांगली महापालिकेत वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता, आता तुमचा हिंदुंचा गब्बर कुठे आहे? हिंदुत्वाची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत. वंदे मातरमला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला राज्यपाल नियुक्त आमदार करता आणि त्याच्या मांडीला मांडी लावून बसता. ही सगळी भंपक लोकं आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
याच इंद्रीस नायकवाडी यांनी एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यालयावर हल्ला केला होता. त्यामुळे सरकारची नियत आणि निती काय आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. अजून सुद्धा इतर सहा जणांच्या कुंडल्या आम्ही काढू शकतो. पण सरकारने वंदे मातरमला विरोध केलेल्या व्यक्तीला आमदार केलं. हे आम्हाला महाराष्ट्राला सांगायचे आहे. आता त्यांनी हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीवर पिपाण्या वाडवायचे अधिकार नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले.