..तर महाकुंभातील गढूळ पाण्यात लोकांना अंघोळ का करायला लावली? संजय राऊतांचा सवाल

मुंबई | प्रदूषणाच्या मुद्द्यावरून होळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात डीजे बंदी करण्यात आली आहे. सरकारला मराठी सणांविषयी इतका आकस का? असा प्रश्न वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनीही सरकारला विचारला आहे. यावरूनच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, की होळीला परवानगी मिळत नाही. गणेशोत्सव येणार आहेत, पीओपीच्या मूर्तींवर बंदी आणलेली आहे. वर्षांनुवर्षे येणाऱ्या सणांवर बंधनं आणत आहात. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. आमच्या वातावरणात हिंदूंचे सण खुल्या वातावरणात होतील,असं या सरकारने म्हटलं होतं. पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर महाकुंभातील गढूळ पाण्यात लोकांना का अंघोळ का करायला लावली? गटारगंगेत लाखो कोट्यवधि लोकांना डुबकी मारायला लावली अन् महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगत आहात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, धुलीवंदनानिमित्त १२ ते १८ मार्चदरम्यान सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाणे, अश्लील इशारे करणे आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर रंगांनी भरलेले फुगे फेकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी जारी केलेल्या आदेशात तसे स्पष्ट करण्यात आले आहे. धुलीवंदनानिमित्त सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी, रंग फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय जातीय तणाव व सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य करू नये, असेही नमुद करण्यात आले आहे.





