संत साई हायस्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस उत्साहात साजरा
सामाजिक संदेश ः आजी आजोबा घरातील अडगळ नसून, घराचा संस्काररूपी कळस, आधार वड आहेत

भोसरी : आदिनाथ नगर येथील संत साई हायस्कूल येथे आज उत्साहवर्धक वातावरणात आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. आजी आजोबा दिवस साजरा करण्यामागचा मुळ उद्देश म्हणजे आपल्या जीवनात त्यांच्या उपस्थितीची कदर करणे आणि मुलांना त्यांच्या आजी आजोबांप्रती अधिक प्रेमळ आणि प्रेमळ बनण्यास मदत करणे. शिवाय मुले त्यांच्या आजी आजोबांशी चांगले संबंध ठेवतात. आणि त्यांच्या बिनशर्त प्रेम आणि उदारपणामुळे एकत्र आनंद घेत असलेल्या दर्जेदार वेळेमुळे त्यांच्याकडे पाहतात. आजी आजोबा म्हणजे घरातील अडगळ नसून घराचा संस्काररूपी कळस,आधार वड आहेत. हा संस्कार देण्यासाठीच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत, दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक श्री शिवलिंग ढवळेश्वर सर यांनी आजचा विद्यार्थी आणि पालक याविषयी महत्वपूर्ण विवेचन केले. उपस्थित सर्व मान्यवरांना यथोचित मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर अजित जगताप यांनी आपली संस्कृती,आपल्या संस्कृतीमध्ये आजी-आजोबांचे स्थान, मार्गशीर्ष महिन्याची पवित्रता, आपले सण आणि संस्कार याविषयी अत्यंत मौलिक शब्दात मार्गदर्शन केले. जीवन शिक्षण मंदिर या तीन शब्दांचा अर्थ समजावून सांगितला.
यानंतर शाळेतील शिक्षकांनी आजी-आजोबांसाठी विविध खेळ उपयोजित केले होते. त्यातून त्यांना आनंद मिळवून दिला. विविध खेळातून आजी-आजोबांना बक्षीस देण्यात आली.
अनेक आजी-आजोबांनी यात सक्रिय सहभाग घेतला. गाणी म्हणून नृत्य करून आजी-आजोबांनी आजच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कार्यक्रम साजरा होत असताना अनेकांनी सेल्फी पॉईंटमध्ये जाऊन आपल्या नातवंडांसोबत सेल्फी सुद्धा घेतले. आजच्या कार्यक्रमाबद्दल अनेकांनी आपल्या कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त केल्या. उषा पांडे या पालकांनी शाळेच्या संस्कारक्षम कार्यक्रमाविषयी तोंड भरून कौतुक केले. शिक्षक, पालक प्रतिनिधी म्हणून अजित लक्ष्मणराव मेदनकर, अनिता गव्हाणे, अरुणा कुंभार, रेणुका नाईक, जाहिदा मोकाशी, गायत्री देवकर, सारिका पालवे, आरती लांडगे, मेघा पाटील, सविता दाते, मुग्धा कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करताना शाळेतील शिक्षक वृंद म्हणून संजय अनार्थे सर, संचालिका सुनीता ढवळेश्वर मॅडम, भारती ढवळेश्वर मॅडम, आरती मुदशेट्टीवर, अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर सर, उपमुख्याध्यापिका रुपाली खोल्लम मॅडम मनोज वाबळे सर, प्रमोद शिंदे सर यांचे बहुमूल्य योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता चौहान मॅडम यांनी केले. सन्माननीय मोघे मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शित करून पसायदानाने आजी आजोबा दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





