चिंचवडच्या ‘समरसता गुरुकुलम’ला महापालिकेचे पालकत्व द्या; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी
मुसळधार पावसामुळे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या आश्रमाचे मोठे नुकसान; शेकडो वंचित विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी : चिंचवड गावातील ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ आश्रमाचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, या आश्रमाची तातडीने डागडुजी करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने त्याचे अधिकृत पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे.
चिंचवड गावातील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मध्ये पारधी, वंचित, उपेक्षित तसेच भटक्या-विमुक्त समाजातील मुलांना शिक्षण, कौशल्य विकास आणि निवारा उपलब्ध करून दिला जातो. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या मुलांना सक्षम नागरिक बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
मात्र, मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आश्रमाच्या इमारतीची पडझड झाली असून, शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य तसेच विद्यार्थ्यांच्या निवासव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी, गुरुकुलमधील दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले असून, येथील विद्यार्थ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
हेही वाचा – NEET-UG 2026 मध्ये अतुल्या डोंगरेची दैदिप्यमान भरारी; 670 गुणांसह देशात 498 वा क्रमांक!
भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘समरसता गुरुकुलम’ हे पिंपरी-चिंचवड शहराचे सामाजिक भूषण आहे. अशा संकटाच्या काळात या सेवाभावी संस्थेला तातडीने मदतीचा हात देणे ही महापालिकेची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिकेने आश्रमाची डागडुजी व दुरुस्ती करून तो पुन्हा राहण्यायोग्य करावा.
तसेच, भविष्यात नैसर्गिक आपत्तींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि संगोपन विस्कळीत होऊ नये, यासाठी महापालिकेने या आश्रमाचे अधिकृत पालकत्व स्वीकारून आवश्यक त्या पायाभूत सुविधा, आर्थिक व प्रशासकीय पाठबळ उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे शेकडो वंचित मुलांना नवे आयुष्य मिळत आहे. त्यामुळे या संस्थेचे जतन आणि संवर्धन करणे ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मतही विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ हे केवळ एक आश्रम नसून, शेकडो वंचित मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचे केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे या संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेने तातडीने मदत करून या आश्रमाचे पालकत्व स्वीकारावे, ही काळाची गरज आहे.”
— भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका





