‘योग्य संघाची निवड केली असती तर…’; केदार जाधवच्या भाजपा प्रवेशावर रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया

मुंबई | भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवने काल (८ एप्रिल) भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश करत राजकारणाच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्याचा पक्षप्रवेश झाला. मात्र, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केदार जाधवच्या भाजपा प्रवेशावर सूचक प्रतिक्रिया देत चर्चेला तोंड फोडलं आहे.
रोहित पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं, “क्रिकेटच्या मैदानातील इनिंगनंतर माझे मित्र आणि #teamIndia चे माजी खेळाडू केदार जाधव नवीन इनिंगसाठी राजकारणाच्या मैदानात उतरत आहेत. त्यांनी योग्य संघाची निवड केली असती तर अधिक आनंद वाटला असता. पण असो! या मैदानावरही ते धुवांधार बॅटिंग करतील, असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.” या वक्तव्यातून रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधत केदार जाधवच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांच्या मते, जर केदारने दुसऱ्या पक्षाची (कदाचित राष्ट्रवादीची) निवड केली असती, तर त्यांना अधिक समाधान वाटलं असतं.
हेही वाचा : साई मारीगोल्ड हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रदीप खंदारे पाटील यांची निवड
केदार जाधवने भाजपात प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. “मोदी आणि फडणवीस यांचं काम पाहून मला प्रेरणा मिळते. माझं ध्येय आहे की देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करायचं. मोदींनी गेल्या १० वर्षांत देशाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे, तर फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास साधला आहे,” असं जाधव म्हणाला.
दरम्यान, रोहित पवार यांच्या सूचक टीकेने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या जाधवच्या या निर्णयावरून आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. जाधव राजकारणाच्या आखाड्यात आपली बॅट कशी चालवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र, रोहित पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर या पक्षप्रवेशाला वेगळं राजकीय वळण मिळालं आहे.