ऑनलाईन शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने ९.४० लाखांची फसवणूक
गुन्हेवृत्त : वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदूखी वाढली

पिंपरी-चिंचवड | देहूरोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेची ऑनलाईन शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात रचित गोयल व अन्य अनोळखी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने “TRIGENA” नावाच्या मोबाईल अॅपद्वारे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी संपर्क साधला होता. आरोपींनी कमी दरात शेअर्स खरेदी करून मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, आरोपींनी विविध बँक खात्यांवर एकूण ₹९,४०,४०६/- रुपये ट्रान्सफर करून घेतले.
हेही वाचा : ‘भारताने पाकिस्तानची ६ विमाने नष्ट केली’; भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांचे मोठे विधान
गुंतवणुकीनंतर फिर्यादीने रकमेबाबत विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी रचित गोयल (मो. ८२३५८३६१९६) व दिव्या सुचक (मो. ९०३४५३४७७१) यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४१८(२), ४१९(२) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वापरलेली बँक खाती YES Bank, IDFC First, AU Small Finance, IndusInd Bank अशा विविध बँकांमधील आहेत. दरम्यान, आरोपींची अटक अद्याप झालेली नसून, देहूरोड पोलिस निरीक्षक जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





