‘महाराष्ट्रात निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी दोन हजार कोटींचं वाटप’; रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. ज्या दिवशी मतदान पार पडलं त्यादिवशी पैसे वाटपाचा आरोप महाविकास आघाडीने केला. त्या पाठोपाठ निलेश लंके यांनीही नगरच्या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा आरोप केला. आता रोहित पवार यांनी राज्यात सत्ताधाऱ्यांनी दोन हजार कोटींचं वाटप केल्याचा आरोप केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपासह सत्ताधारी पक्षांकडून पैशांचं अमाप वाटप होतं आहे. नेते, गुंड आणि मतं विकत घेण्यासाठी आत्तापर्यंत राज्य सरकारन दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. तर मागच्या अडीच वर्षांत या सरकारने २५ हजार कोटींचे घोटाळे केले आहेत.आमची सत्ता आल्यानंतर आम्ही या सगळ्या प्रकरणांची चौकशी करु.
हेही वाचा – सांगलीचा खासदार कोण? बुलेट आणि युनिकॉर्नची पैज
सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटपसाठी टँकर, रुग्णवाहिका, झेड सिक्युरिटीतल्या गाड्या, हेलिकॉप्टर या सगळ्यांचा वापर केला असाही आरोप रोहित पवारांनी केला आहे. आता निवडणुकीत शेतकरी आणि मराठी माणूस सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार आहे असंही वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. तसंच महायुतीला जास्त जागा मिळणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. एकट्या बारामतीत १५० कोटी रुपये मतदानाच्या पू्वी खर्च करण्यात आले असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला १३ ते १४ जागा, एकनाथ शिंदेंच्या गटाला ३ जागा मिळतील तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. महायुतीला १६ ते १८ जागा मिळतील बाकी जागा आम्ही जिंकू असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.





