मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार
अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना (उबाठा) साथ देणार का?
मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून या बाबतची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शिवसेना (उबाठा) मदत करणार का? असा प्रश्न विचारला होता यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
अमित ठाकरे महत्वाचे नेते
संजय राऊत म्हणाले की, ” ही लोकशाही आहे. त्यांचा एक स्वत:चा पक्ष आहे. त्यांचे वडील पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षाने अमित यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर मी एक कशाला व्यक्त व्हायचे? अमित ठाकरे हे तरुण नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. जर त्यांच्या पक्षाने आणि कुटुंबाने निर्णय घेतला तर आम्ही पण म्हणू की एक तरुण मुलगा राजकारणात येत आहे”.
राज ठाकरे कधीही स्वबळावर लढत नाही
आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून निवडणूक लढवली तेव्हा मनसेने सहकार्य केले होते. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्यात आला नव्हता. आता अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना (उबाठा) साथ देणार का? असा प्रश्न विचारल्यावर त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ” ते भाजपासोबत आहेत. त्यांचा पक्ष शिंदे गटासोबत किंवा भाजपसोबत आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. राज ठाकरे कधीही स्वबळावर लढत नाही. ते महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर असतात हा आमचा अनुभव आहे”.
राज ठाकरे महाराष्ट्राचे शत्रू होऊ शकतात
राऊत पुढे म्हणाले की, ”महाराष्ट्राला कमकुवत करणाऱ्या ज्या शक्ती आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे तीन शत्रू आहेत. त्यामध्ये शिंदे शिवसेना गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार हे तिघे जण महाराष्ट्राचे शत्रू आहेत. या तिन्ही शत्रूंना जे लोक अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतात ते सुद्धा महाराष्ट्राचे शत्रू होऊ शकतात. असं नाव घेता संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.




