कंदीलांचा आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेचा काय संबंध? शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे कंदील काढल्याने राज ठाकरेंचा संताप

Raj Thackeray | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पंतप्रधान मोदी यांचीही सभा पार पडणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिवाजीपार्कवर मनसेने दीपोत्सवासाठी लावलेले कंदील सुरक्षेच्या कारणास्तव काढण्यात आले आहेत. यावरूनच आता राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. दिवाळीच्या कंदीलांचा आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेचा काय संबंध? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. ते दिंडोशी विधानसभा मतदारसंघात एका सभेत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, की आपण दिवाळीला शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करतो. त्याचे व्हिडीओ आपण सर्वांनीच बघितले असतील. अनेक जण तिथे येऊन फोटो किंवा व्हिडीओ काढतात. पण रविवारी अचानक याठिकाणी वीज बंद करण्यात आली. तसेच सर्व मीटर्स बीएसटीवाले घेऊन गेले, कारण काय? तर १४ तारखेला तिकडे पंतप्रधानांची सभा आहे. मुळात दिवाळीच्या कंदीलांचा आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेचा काय संबंध? पंतप्रधान आले असते आणि त्यांनी तिकडे कंदील बघितले असते, तर त्यांनाही आनंद झाला असता. नको तिकडे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करतात.
हेही वाचा – Pune | जिल्ह्यात आचारसंहिता कालावधीत 31 कोटी 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
दिवाळी हा आपला हिंदू सण आहे. तो सणासारखा साजरा नाही, करायचा तर कसा करायचा? दरवर्षी हे कंदील तुळशीच्या लग्नापर्यंत असतात, त्यानंतर आपण ते काढतो. या महाराष्ट्रात अनेकदा दहीहंडी बंदी आणण्याचा प्रयत्न झाला, गणपतींचे मंडप उभारण्याला विरोध झाला, त्यावेळी मसनेचे आवाज उठवला आणि या सणांवरची बंदी उठवली. आज हिंदुत्त्ववादी विचारांचे पंतप्रधान तिथे येतात आणि तुम्ही दिवाळीचे कंदील बंद करता म्हणजे तुमची कमालच आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.





