‘दुधात भेसळ करणाऱ्यांवर मोक्का लावणार’; राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा
![Radhakrishna Vikhe Patil said that they will apply measures against those who adulterate milk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Radhakrishna-Vikhe-Patil-780x470.jpg)
पुणे : दूध भेसळ करणारे आणि भेसळयुक्त दुध खरेदी करणाऱ्या खासगी किंवा सहकारी दूध संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर मोक्का लावण्याचा इशारा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्या दूधसंघ तसेच ज्या व्यापाऱ्यांसाठी भेसळ युक्त दूध तयार केले जात होते. त्यांच्याही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कठोर कारवाईमुळे दुधामध्ये भेसळ करण्याचे धाडस कोणी करणार नाही. दूध भेसळ रोखण्याकरीता तसेच कारवाईसाठी महसूल विभागाची मदत घेतली जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.
हेही वाचा – भाजपविरोधात विरोधकांची मोट, नितीश कुमारांची मोठी घोषणा!
या समितीमध्ये अतिरिक्त पोलिस अधिक्षक, अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन अधिकारी, दुग्धविकास अधिकारी असतील. तहसिलदार, प्रांताधिकारी यांच्या स्तरावरून सुद्धा दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुध्द कारवाई होईल. कमी मनुष्यबळ असल्याने दुधात भेसळ करणाऱ्यांविरुध्द कारवाई कमी होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून बैठकीत सांगण्यात आले. यामुळे आरे विभागातील २५० कर्मचारी अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे वर्ग केले जाणार आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय लवकर होईल. त्यामुळे दुधाची भेसळ करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याचे प्रमाण वाढेल, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.