‘गौतमीची लावणी कला नव्हे, उथळपणा’; प्रिया बेर्डे
गौतमी पाटीलच्या लावणीला कला म्हणता येणार नाही

Gautami Patil : लावणी हा सुंदर कलाप्रकार असला तरी गौतमी पाटीलसारख्या कलाकारांच्या लावणीला कला म्हणताच येणार नाही. रसिकांनी अशा उथळपणाकडे दुर्लक्ष करायला हवे, असं मत भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केलं आहे.
गौतमी पाटील यांच्यासारख्या कलाकारांना अकारण मोठे केले जात आहे. रसिक जोपर्यंत असे प्रकार दुर्लक्षित करणार नाहीत तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहतील. कलेच्या नावावर काहीही खपविण्यात येते. पारंपरिक लावणी व नृत्य अत्यंत सुंदर आहे. यातील अस्सलपणा हरविला जाऊ नये, तो टिकविण्याचे काम रसिकांनीच केले पाहिजे, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
कला क्षेत्रात अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी आमची आघाडी प्रयत्नशील आहे. राज्यात, देशात व देशाबाहेरही कला उत्सव घेऊन कलाकारांना बळ देण्याचा विचार आहे. कलाकारांचे मानधन अजून वाढविण्याबाबत आमचे प्रयत्न राहतील. शासनाकडे अशा बऱ्याच योजना आम्ही घेऊन जाणार आहेत, असंही प्रिया बेर्डे म्हणाल्या.





