‘भाजपा पश्चिम बंगालमध्ये बहुमताने सरकार स्थापन करेल’; पंतप्रधान मोदींचा विश्वास

Narendra Modi | पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रमुख पक्षांचे नेते प्रचारसभांमधून जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुलिया जिल्ह्यातील सभेत भाजपाच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसवर तीव्र टीका केली. तसेच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा प्रचंड बहुमताने विजयी होईल आणि सरकार स्थापन करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी सहसा निवडणुकीच्या काळात कोणताही अंदाज वर्तवत नाही. किंवा निकाल काय येईल? यावरही मी काही भाष्य करत नाही. मी अनेक वर्षांपासून निवडणूक लढवतो. पण अंदाज वर्तवण्याच्या अशा गोष्टी मी शक्यता टाळतो. मात्र, या निवडणुकीच्या अनुषंगाने जो कोणी मला भेटतो, तो प्रत्येकजण म्हणतो की यावेळी भाजपाचं सरकार निश्चित आहे. त्यामुळे या सर्वांचं मत मी ऐकल्यावर आणि माझा जेवढा राजकीय अनुभव आहे, त्यावरून मी आज सांगतो की पश्चिम बंगालमध्ये यावळी भाजपा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं क्रूर सरकार १५ वर्षांपासून सत्तेवर आहे आणि केंद्रात भाजपाचं सरकार ११ वर्षांपासून सत्तेवर आहे. पण या १५ वर्षांत तृणमूल काँग्रेसच्या गैरकारभाराने, भीतीने आणि भ्रष्टाचाराने पश्चिम बंगालमधील प्रत्येक कुटुंबाला भयभीत केलं आहे. याच काळात भाजपाच्या सुशासनावरील जनतेचा विश्वास अधिक वाढला आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
हेही वाचा : ‘देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस फेल’; संजय राऊतांचा हल्लाबोल
तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांनी हजारो तरुणांची फसवणूक करून शिक्षक भरतीत घोटाळा केला आहे. टीएमसीच्या या जंगलशाहीत टक्केवारी घेतल्याशिवाय कोणतंही काम होत नाही. मग अशा परिस्थितीत राज्यात उद्योग कसे येणार? त्यामुळे या ठिकाणी उद्योगधंद्यांना मोठा फटका बसतो. कारखाने तृणमूल काँग्रेसच्या भीतीने येत नाहीत. कंपन्या विश्वासाने येत असतात. कारखाने विश्वासावर चालतात. गुंतवणूक विश्वासाने येत असते. त्यामुळे आता माझ्या राजकीय अनुभवावरून मला खात्री आहे की ४ मे नंतर भाजपाचे मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये शपथ घेतील. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान दोघेही भाजपाचे असल्याने पश्चिम बंगालचा विकास सध्याच्या गतीपेक्षा दुप्पट वेगाने होईल, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगाल येथील भातशेती करणारे शेतकरी त्रस्त आहेत. येथील अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहेत. सुवर्णरेखा प्रकल्पाची अवस्था बघा काय झालीय, अनेक दशकं उलटली, पण कालव्यांना पाणी मिळालेलं नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधीच सुकत नाहीत. हे निर्दयी सरकार केवळ लूटमार करतं आणि लुटारूंना संरक्षण देतं. मी आज तुम्हाला आश्वासन देतो की भाजपा सरकार ही टीएमसीची लूट थांबवेल आणि तुमच्या शेतात पाणी आणेल. टीएमसीने प्रत्येक पावलावर बंगालच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. आपण बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची दुर्दशा पाहत आहोत. टीएमसी सिंडिकेटचं बाजारपेठा आणि शीतगृहांवर नियंत्रण आहे. भाजपा या सिंडिकेटचं नियंत्रण मुळापासून उखडून टाकेल. शेतकऱ्यांना डबल-इंजिन सरकारचे दुप्पट फायदे मिळतील. ही मोदींची हमी आहे, असं म्हणत मोदींनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली.





