वनडे विश्वचषक २०२७ चा फॉरमॅट बदलला; ICC ची मोठी घोषणा!

ICC Changes ODI WC Format | क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी, १५ जुलै रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेत २०२७ च्या पुरुष एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup 2027) स्पर्धेच्या स्वरूपात (Format) मोठे बदल जाहीर केले आहेत. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७ मध्ये होणाऱ्या या महाकुंभामध्ये आता चाहत्यांना पूर्णपणे नवीन आणि यापूर्वी कधीही न पाहिलेले स्वरूप पाहायला मिळणार आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या या विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असतानाच आयसीसीच्या या नव्या नियमांमुळे स्पर्धेतील चुरस प्रचंड वाढणार आहे.
१४ संघ असूनही मुख्य फेरीत केवळ १२ संघांनाच एन्ट्री!
यापूर्वी २०२७ च्या विश्वचषकासाठी २००३ सारखा फॉरमॅट (२ गट, सुपर-६ आणि उपांत्य फेरी) असेल, अशी चर्चा होती. मात्र, आयसीसीने त्यात मोठा बदल केला आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी होणार असले, तरी मुख्य फेरी सुरू होण्यापूर्वीच दोन संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मुख्य स्पर्धा ही १२ संघांमध्येच रंगणार आहे.
कसा असेल विश्वचषकाचा नवीन फॉरमॅट?
१. पहिली फेरी (सुपर सिरीज – साखळी पद्धत):
विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या एकूण १४ संघांपैकी रँकिंगमध्ये तळाला असलेल्या (Bottom 3) तीन संघांमध्ये सुरुवातीला ‘सुपर सिरीज’ खेळवली जाईल. या साखळी मालिकेतील अव्वल विजेता संघ दुसऱ्या फेरीत (मुख्य फेरीत) प्रवेश करेल, तर उर्वरित दोन संघ गट फेरी सुरू होण्यापूर्वीच मायदेशी परततील.
हेही वाचा
“सरकार रामाची तिजोरी लुटताना..”; सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका
२. दुसरी फेरी (मुख्य गट फेरी – ३० सामने):
या फेरीत पहिल्या फेरीतील एका विजेत्यासह एकूण १२ संघ खेळतील. या १२ संघांची प्रत्येकी ६ संघांच्या दोन गटात (Group A & Group B) विभागणी केली जाईल. दोन्ही गटात साखळी पद्धतीने सामने होतील. यानंतर दोन्ही गटातील अव्वल ३-३ (एकूण ६ संघ) थेट पुढच्या फेरीत जातील. तर दोन्ही गटातील चौथ्या क्रमांकाचे संघ एकमेकांविरुद्ध खेळून पुढील फेरीतील ७ व्या स्थानासाठी लढतील.
३. तिसरी फेरी (ऐतिहासिक ‘सुपर-७’ – २१ सामने):
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच ‘सुपर-७’ (Super 7) फेरी पाहायला मिळेल. या फेरीत पोहोचलेले सातही संघ एकमेकांविरुद्ध साखळी सामने खेळतील. या २१ सामन्यांच्या थरारानंतर गुणतालिकेतील (Points Table) अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी (Semifinals) पात्र ठरतील.
उपांत्य आणि अंतिम फेरीचे गणित
‘सुपर-७’ च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेला संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी पहिल्या उपांत्य सामन्यात भिडेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये दुसरी उपांत्य लढत रंगेल. या दोन सामन्यांतील विजेत्यांमध्ये विश्वविजेतेपदासाठी अंतिम सामना खेळवला जाईल.





