‘भारतानं जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिला’; पंतप्रधान मोदींचा व्हिएन्नातील भारतीयांशी संवाद
![Prime Minister Narendra Modi said that India gave the world not war, but Buddha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Narendra-Modi-780x470.jpg)
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वॅन डेर बेलन आणि चॅन्सेलर कार्ल नेमर यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दौऱ्यादरम्यान चर्चा केली. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रांमधील द्वीपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर देण्यासंदर्भात सहमती झाली. त्याशिवाय, युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावासंदर्भातही दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली.त्यानंतर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएन्नामध्ये असून तिथल्या भारतीयांशी त्यांनी बुधवारी संवाद साधला. यावेळी भारतानं जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिला, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत सध्या सर्वोत्तम होण्याचा, सर्वाधिक यश मिळवण्याचा आणि सर्वोच्च यश गाठण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या हजारो वर्षांपासून भारतानं आपलं ज्ञान आणि कौशल्य जगभरात इतरांना दिलं आहे. आपण जगाला युद्ध दिलेलं नाही, तर बुद्ध दिला आहे. भारतानं नेहमीच जगाला शांतता आणि समृद्धी दिली. त्यामुळे २१व्या शतकात भारत जागतिक पटलावर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दौरा आहे. इतक्या वर्षांपासूनची ही प्रतीक्षा एका ऐतिहासिक क्षणी संपली आहे. भारत आणि ऑस्ट्रिया त्यांच्या मैत्रीची ७५ वर्षं पूर्ण करत आहेत.
हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात ‘इतकी’ वाढ
भारत आणि ऑस्ट्रिया भौगोलिकदृष्ट्या दोन टोकाच्या ठिकाणी आहेत. पण आपल्यामध्ये अनेक साम्यदेखील आहेत. दोन्ही देशांना लोकशाही बांधून ठेवते. स्वातंत्र्य, समता, विविधता आणि कायद्याचा सन्मान ही मूल्य दोन्ही देशांसाठी समान महत्त्वाची आहेत. आपले समाज बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक आहेत. दोन्ही देशांमध्ये विविधता दिसून येते. ही सर्व मूल्य दोन्ही देशांमधल्या निवडणुकांमध्ये परावर्तित होत असतात, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.