माझ्या नसांमधून ‘गरम सिंदूर’ वाहते’; पाकिस्तानला पंतप्रधान मोदींचा कठोर इशारा

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला आतंकवादाविरोधात कठोर इशारा दिला आहे. जेव्हा ‘सिंदूर’चे रुपांतर दारुगोळ्यात होते, तेव्हा काय होते, हे जगाने पाहिले. मोदींच्या नसांमध्ये रक्त नाही तर ‘गरम सिंदूर’ वाहते (मोदी की नासो में लहू नहीं, गरम सिंदूर बह रहा है) आणि यापुढे प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला जबर मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे.
पंतप्रधान म्हणाले, मोदीच्या नसांमध्ये रक्त नाही, तर गरम सिंदूर वाहत आहे. आमच्या माता-भगिनींच्या माथ्यावरील सिंदूर पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना भारत मिट्टीत मिळवेल. भारतीय सैन्याने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानातील आतंकी तळ उद्ध्वस्त केले. २२ तारखेच्या हल्ल्याला २२ मिनिटांत उत्तर देत आम्ही आतंक्यांचे नऊ मोठे अड्डे नष्ट केले, असे ते म्हणाले.
हेही वाचा : सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू; नगरी हक्क कृती समिती
आमच्या सरकारने तिन्ही सशस्त्र दलांना मोकळीक दिली. त्यांनी मिळून असा सापळा रचला की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. पाकिस्तानने बिकानेरमधील नल हवाई तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्याचे कोणतेही नुकसान करता आले नाही. याचाच दाखला देत, पाकिस्तानमधील रहिमयार खान हवाई तळ पुन्हा कधी उघडेल हे कोणालाही माहिती नाही. तो ‘आयसीयू’मध्ये आहे. भारताच्या हल्ल्याने तो तळ उद्ध्वस्त झाला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
राजस्थानच्या भूमीवरून मी देशवासीयांना सांगू इच्छितो, की जे लोक ‘सिंदूर’ पुसण्यास निघाले होते ते पुसले गेले. ज्यांनी हिंदुस्थानचे रक्त सांडले त्यांनी त्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली आहे. ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा अभिमान होता, ते आता ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.