सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू; नगरी हक्क कृती समिती

पिंपरी | मोहननगर, रामनगर, विद्यानगर, आनंदनगर, काळभोरनगर आणि आसपासच्या परिसरातील वीजपुरवठ्याच्या प्रश्नाबाबत व्यापारी आणि नागरिक प्रतिनिधींची महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात बैठक झाली. गेल्या एका वर्षापासून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार, अर्ज आणि विनंत्या केल्या गेल्या. मात्र, यापुढे अर्ज किंवा विनंत्या केल्या जाणार नाहीत, “काम करा, नाहीतर खुर्ची खाली करा,” असे स्पष्टपणे सांगण्यात आले. यापूर्वी सर्वपक्षीय मोर्चा आणि नगरी हक्क कृती समितीच्या वतीने आंदोलन करून नऊ-दहा महिने उलटले, तरीही परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न सुटलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे, याची जाणीव अधिकाऱ्यांना करून देण्यात आली.
एका महिन्याच्या आत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. वीज ही मूलभूत गरज असून, कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच व्यवसायांवर विपरीत परिणाम होत आहे.
या परिसरातील व्यापारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर रहिवासी गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे त्रस्त आहेत. महावितरण कंपनीने प्रत्येक वेळी आश्वासने दिली, परंतु आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही किंवा उपाययोजना झालेली नाही. ही बाब अत्यंत खेदजनक आणि संतापजनक आहे. परिणामी, दूध, अन्नपदार्थ, भाजीपाला आणि इतर नाशवंत वस्तू खराब होत असल्याने व्यापारी आणि नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. संध्याकाळी वीज नसल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा : शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे साजरा करा; संभाजी भिडेंची मोठी मागणी
वीजबिल थकविल्यास तात्काळ कारवाई करणारे अधिकारी नियमित आणि अखंडित वीजपुरवठा करण्यात का अपयशी ठरत आहेत, हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. शहरी भागातील वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एका वर्षाहून अधिक काळ लागणे, तसेच ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या नावाखाली केवळ वेळकाढूपणा करणे आणि नागरिकांची दिशाभूल करणे अत्यंत निषेधार्ह आहे.
नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती या बैठकीत करण्यात आली. यावेळी नगरी हक्क कृती समितीच्या वतीने कमलेश लुंकड, महादेव नेर्लेकर, कमलेश दिलीप मुथा, अनिल राऊत, दत्ता देवतारासे, राहुल दातीर पाटील, गुलशन सुतार, रमेश जाट, सतीश शर्मा, राजू दळवी आणि इतर उपस्थित होते.