प्रकाश आंबेडकरांचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप; म्हणाले..

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपाने हिंदू-मुस्लिम यांच्यातला वाद आणि तिरस्कार अंतिम टोकावर आणला आहे तो वाढवण्याची जागा नाही. त्यामुळे तिरस्कार हाच त्यांच्या राजकारणाचा पाया आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशातलं वातावरण राम मंदिरामुळे धार्मिक झालेलं आहेच. पण अजून धार्मिकता येईल असं वाटत नाही. मात्र यातला एक प्लस पॉईंट दिसतोय तो म्हणजे सत्ता आणि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे दिसायला लागलं आहे. लोकांना हे कळू लागलं आहे. देवळातली मूर्ती पूजा ही व्यक्तिगत स्वरुपाची आहे, भावनेशी संबंधित आहे. तर संसदेतील सत्ता ही लोकांशी संबंधित आहे, नोकऱ्या देणारी आहे. लोकांमध्ये दोन मतं स्पष्ट होत आहेत हे चांगलं आहे.
हेही वाचा – ‘महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला’; सुप्रिया सुळेंची माहिती
शरद पवार यांना मी उघडपणे पत्र दिलं आहे. त्यात गुप्त काहीही नाही. तसंच शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी आमचं असं ठरलं आहे की त्यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी काही जमलं नाही तर आम्ही दोघांनी निवडणूक लढवायची असेल तर आम्ही २४-२४ जागा लढवू हे ठरलं आहे. आता महाविकास आघाडीचं काय ते तिघांपैकीच कुणीतरी सांगू शकेल. काँग्रेस हा इंडिया आघाडीतला महत्त्वाचा पक्ष आहे. त्यांनी पक्ष वाढवायचा की मोदी आणि भाजपाचं सरकार घालवायचं याचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही. तो निर्णय त्यांनी घेतला तर बाकीच्या गोष्टी आपोआप सुरळीत होतील.
राजकीय पक्षाने सरंजामशाही भूमिका घेऊ नये. त्यांनी निवडणूक लढवावी, जे काही होईल जय किंवा पराजय त्याला सामोरं जावं. जमलं तर जमलं नाही जमलं तर सोडून द्यायचं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.





