‘महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला’; सुप्रिया सुळेंची माहिती

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तीन मोठे पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) असे तीन प्रमुख पक्ष आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत इंडिया आघाडीचा महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यावर फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. येत्या ८-१० दिवसांत त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.
हेही वाचा – श्रीराम मंदिर, योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, FIR दाखल
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील यावर भाष्य केलं. ते म्हणाले, येत्या एक-दोन दिवसांत जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची दिल्लीत एक बैठक झाली आहे. काँग्रेसच्या पक्षांतर्गत काही बैठका दिल्लीत पार पडल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. तिन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र बसतील आणि या आठवड्याभरात सर्व गोष्टी ठरतील अशी मला अपेक्षा आहे, असं जयंत पाटील म्हणाले.





