‘३ डिसेंबरनंतर देशात कुठे ना कुठे नरसंहार घडण्याची शक्यता’; प्रकाश आंबेडकरांचं सूचक विधान

मुंबई : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकां सुरू आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. ते संविधान सन्मान महासभेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या देशात आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजाला एकमेकांच्या विरोधात लढवलं जातं आहे, अशी परिस्थिती आहे. हे थांबवण्याऐवजी खतपाणी घातलं जातं आहे. २००४ मध्ये गोधरा हत्याकांड घडलं, २०२३ मध्ये मणिपूरमध्ये नरसंहार झाला. कदाचित ३ डिसेंबरनंतर देशातील कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या.
हेही वाचा – Mumbai 26/11 Attacks : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला आज १५ वर्षे पूर्ण!
जनतेला माझं आवाहन आहे की, देशात भडकवणाऱ्या संघटना बऱ्याच आहेत. जे भडकवणारे नेते आहेत, त्यांना म्हणा.. आधी तुमचा मुलगा पुढे करा मग आम्ही पाठीमागे येतो. स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवायचं आणि लोकांना पुढे करायचं. स्वत:ला इजा होऊ द्यायच्या नाहीत, पण दुसऱ्याला इजा होऊ द्यायच्या, अशा भूमिकेपासून आपण सावध राहायला हवं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.





