Political Analysis: भोसरीत सोसायटीधारक, उच्चशिक्षित ठरले ‘‘किंगमेकर’’
विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांच्या पारड्यात मते : मुस्लिमबहुल भागातही महायुतीला मिळाले बरोबरीत मतदान

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
महाविकास आघाडी आणि स्थानिक नेत्यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सोसायटीधारक आणि उच्चशिक्षित मतदारांनी महायुतीच्या पारड्यात मतदान टाकलेले आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांचा विजय सोपा झाला. विशेष म्हणजे, झोपडपट्टी व मुस्लिमबहुल मतपेट्यांमध्ये लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महाविकास आघाडीला एकतर्फी मते मिळतील, असा दावा केला जात होता. मात्र, या मतपेट्यांमध्ये महायुती-महाविकास आघाडीला बरोबरीत मते मिळाली आहेत.
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना २०१४ आणि २०१९ असे दोनवेळा सलग पराभूत करीत आमदार महेश लांडगे यांनी २०२४ ची निवडणूक लढवली. महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हावर उमेदवारी देण्यात आली. गव्हाणे यांनी गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू केली होती. तसेच, सर्व विरोधकांची मोट बांधली होती. लांडगे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरेल, असा अंदाज बांधला जात होता.
आमदार महेश लांडगे यांनी विकासाच्या मुद्यावर आणि भविष्यात काय करणार या ‘व्हीजन’बाबत लोकांशी संवाद केला. कोणताही आरोप-प्रत्यारोप न करता ही निवडणूक संयमाने आणि नियोजनबद्ध लढवली. त्याचबरोबत हिंदूत्ववादी भूमिका कदापि सोडली नाही. याउलट, अजित गव्हाणे यांनी दहशत, दडपशाही आणि भ्रष्टाचार अशी चिखलफेक केली. उच्चशिक्षित, सुशिक्षित मतदार आणि सोसायटीधारकांमधील संवेदशनील मतदारांना हा प्रचार रुचला नाही. त्यामुळे लांडगे यांना मताधिक्य मिळाले, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.
भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण ६१.१४ टक्के मतदान झाले. एकूण ६ लाख ८ हजार ४२५ मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख २८ हजार २८० पुरुष तर २ लाख ८ हजार ४८ महिला तर अन्य ९७ मतदार आहेत. या निवडणुकीत एकूण ३ लाख ७५ हजार ४०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार महेश लांडगे यांना २ लाख १३ हजार ६२४ मते मिळाली आहेत, तर अजित गव्हाणे यांना १ लाख ४९ हजार ८५९ मते आहेत. तब्बल ६३ हजार ७६५ मताधिक्याने महेश लांडगे विजयी झाले आहेत.
फतवा विरुद्ध भगवा…
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महेश लांडगे यांच्या प्रखर हिंदूत्त्ववादी भूमिकेला ‘टार्गेट’ करण्यात आले. तसेच, संविधान भवनाच्या जनजागृती फ्लेक्सवरील कथित स्वाक्षरीवरुन ‘ फेक नॅरेटिव्ह’ करण्याचा प्रयत्न केला. मातब्बर नेते माजी महापौर आझम पानसरे यांनी मुस्लिम संघटनांना एकत्र करीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मेळावा घेतला आणि जाहीर पाठींबा दिला. तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी चिखलीतील जाहीर ‘व्होट जिहाद’चे समर्थन केले. त्याद्वारे मुस्लिम व अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण होईल, असा कयास होता. मुस्लिम बहुल भाग आणि झोपडपट्टी, बैठी घरे भागात अजित गव्हाणे यांना चांगली मते मिळालेली आहेत. मात्र, अपेक्षीत असलेले एकतर्फी लीड मिळालेले नाही. ‘फतवा विरुद्ध भगवा’ असा संदेश तळागाळात पोहोचला आणि महेश लांडगे यांच्यापाठीमागे हिंदू समाजाने जातीभेद विसरुन मतदान केले. ‘माझं हिंदूत्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनुसार, आठरापगड जाती, बाराबलुतेदारांचे हिंदुत्व आहे’’, या महेश लांडगे यांच्या भूमिकेला मतदारांनी साथ दिली.
मातब्बरांच्या प्रभागातील मविआची पिछेहाट…
आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वावर आणि कार्यपद्धतीवर आरोप करीत सहा नगरसेवकांनी भाजपाला निवडणुकीपूर्वीच सोडचिठ्ठी दिली होती. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सुमारे ४० जणांनी ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर म्हणजे स्वत: उमेदवार असल्याप्रमाणे लढवली. आपआपल्या प्रभागात प्रचंड प्रचार आणि नियोजन केले आणि महेश लांडगे यांना चौफेर टीका-टीपण्णी केली. तळवडे-रुपीनगरमधून माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी थेट आरोप करीत प्रसारमाध्यमांमध्ये हवा केली. मोशीमध्ये माजी नगरसेवक वसंत बोराटे, शिवसेनेचे धनंजय आल्हाट, परशुराम आल्हाट यांनी उठाव केला. चऱ्होलीतून विनया तापकीर, कुणाल तापकीर यांनी अक्षरश: रान पेटवले. चिखली आणि घरकुल परिसरातून माजी नगरसेवक संजय नेवाळे, विष्णुपंत नेवाळे, यश साने, विकास साने या मंडळींनी ताकदीने काम केले. नेहरुनगर प्रभागातून माजी नगरसेवक राहुल भोसले, माजी महापौर वैशाली घोडेकर यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. इंद्रायणीनगर आणि सभोवतालच्या भागात माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, माजी नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे यांच्यासह तुषार सहाणे, संजय उदावंत यांनी तगडे आव्हान दिले होते. भोसरी गावठाण भागात माजी नगरसेविका सारिका लांडगे, भीमाबाई फुगे, जालिंदर शिंदे यांच्यासह रवि लांडगे यांनी आमदार महेश लांडगे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. निगडीमध्ये माजी नगरसेवक सुमन पवळे, धनाजी खाडे, शुभांगी बोऱ्हाडे यांनी प्रखर विरोध केला. मात्र, अपवादात्मक तीन-चार बूथ वगळता महेश लांडगे यांना मताधिक्य राहिले आहे.
‘होमपिच’वर अजित गव्हाणे यांना फटका…
गेल्या २० वर्षांपासून ज्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व अजित गव्हाणे करीत होते. संत तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, संत ज्ञानेश्वरनगर, शास्त्री चौक, जय महाराष्ट्र चौक, हुतात्मा चौक, रामनगरी सोसायटी या भागात अजित गव्हाणे पिछाडीवर आहेत. महाविकास आघाडीच्या विचाराने लढणारे तीन माजी नगरसेवक या प्रभागातून महेश लांडगे यांना आव्हान देवू शकले नाहीत. माजी नगरसेविका प्रियांका बारसे आणि अनुराधा गोफणे यांनी पूर्ण ताकद लावली. २० वर्षे प्रभागात प्रतिनिधीत्व करीत असतानाही गव्हाणे यांना या प्रभागात वर्चस्व ठेवता आले नाही. ‘फेक नॅरेटिव्ह’ चा प्रयत्न आणि विकासाच्या मुद्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे गव्हाणे यांना आमदारकी किंवा विधानसभेसाठी लोकांनी स्विकारले नाही, असेही निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.