कर्नाटक विधानसभेत सावरकरांचा फोटो लावण्यावरून गदारोळ, काँग्रेसचे धरणे आंदोलन
बंगळुरू : कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो लावण्यावरून गदारोळ झाला. त्याविरोधात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह अन्य नेत्यांनी विधानसभेबाहेर धरणे आंदोलन केले. सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालू नये, असे सत्ताधारी पक्ष भाजपाला वाटत असल्याने ते स्वतःच त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. सरकारविरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आम्हाला समोर आणायची होती, म्हणून भाजपाने हा फोटोचा मुद्दा समोर आणून वाद निर्माण केला. त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही, असा आरोप कर्नाटक काँग्रेसचे आमदार डी. के. शिवकुमार म्हणाले.
वाल्मिकी, बसवण्णा, कनक दास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर नेत्यांची छायाचित्रेही लावावीत, अशी मागणी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी सभापतींना पत्र लिहून केली आहे.





